मुंबई महापालिकेतील शिवसेना नगरसेवकाचं सदस्यत्व रद्द
एबीपी माझा वेब टीम | 07 Aug 2018 06:20 PM (IST)
प्रभाग क्रमांक 91 चे शिवसेना नगरसेवक सगुण नाईक यांचं जातप्रमाणपत्र पडताळणीत अवैध ठरल्याने त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं
मुंबई : मुंबई महापालिकेतील शिवसेना नगरसेवकाचं महापालिका सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. प्रभाग क्रमांक 91 चे शिवसेना नगरसेवक सगुण नाईक यांचं जातप्रमाणपत्र पडताळणीत अवैध ठरलं. सगुण नाईक यांचं महापालिका सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय कोकण विभागीय आयुक्तांनी दिला होता. त्यानुसार महापालिकेच्या सभागृहात त्यांचं महापालिका सदस्यत्व रद्द करण्यात आल्याची घोषणा महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केली. मुंबई महापालिकेच्या 2017 च्या सार्वजनिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 91 मधून शिवसेनेचे उमेदवार सगुण नाईक विजयी झाले होते. परंतु नाईक यांनी सादर केलेल्या जात प्रमाणपत्राबाबत दुसऱ्या क्रमांकावरील काँग्रेसचे उमेदवार रफिक शेख यांनी आक्षेप नोंदवत कोकण विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली. सगुण नाईक यांना जात प्रमाणपत्र वैधतेबाबतचे पुरावे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु त्यांच्याकडे कोणतेही पुरावे नसल्याने त्यांचं जातप्रमाणपत्र अवैध ठरवत त्यांचं महापालिका सदस्यत्व रद्द करण्याचं पत्र कोकण विभागीय आयुक्तांनी महापालिका आयुक्तांना पाठवलं.