मुंबई :  बीएमसीतील (BMC)  कार्यकारी सहाय्यक पदासाठी  काढण्यात आलेल्या जाहिरातीतील जाचक अटी शिथिल करा, अशी मागणी करणारे पत्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray)  यांनी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी  यांना पत्र लिहले आहे. भरतीतील जाचक अटीमुळं अनेक उमेदवार अर्ज भरु शकणार नसल्यानं त्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. यामुळं आदित्य ठाकरे यांनी  महापालिका आयुक्तांकडे  अन्यायकारक अट रद्द करण्याची मागणी केली आहे.


मुंबई महापालिकेनं नुकतीच 1846 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. मुंबई महापालिकेनं कार्यकारी सहायक (BMC Recruitment 2024) या पदाच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी निश्चित करण्यात आलेली शैक्षणिक अर्हता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या भरतीसाठी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांनी दहावी आणि पदवीच्या परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. या  मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहायक या पदासाठी काढण्यात आलेल्या जाहिरातीत जाचक अट घालण्यात आली आहे, उमेदवार हा दहावी आणि पदवीच्या परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण झालेला असावा अशी अट घालून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे  दोन  ते तीन लाख मुला-मुलींना परीक्षेचा अर्जच भरता येणार नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले. 


काय म्हणाले आदित्य ठाकरे?


मुंबई महानगरपालिकतर्फे कार्यकारी सहाय्यक या पदांसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.  या जाहिरातीत नमूद केलेल्या अटींमध्ये "पहिल्या प्रयत्नात पदवी" उत्तीर्ण असणे ही जाचक अट घातली आहे. या कारणास्तव महाराष्ट्रातील दोन ते तीन लाख मुला-मुलींना परीक्षेचा अर्ज ही भरता येणार नाही व त्यांच्यासाठी ही अट अन्यायकारक आहे. सध्या महाराष्ट्रातील बेरोजगारीचा भयावह प्रश्न पाहता आपण कृपया या अटीच्या पुनरावलोकनासाठी योग्य ती कारवाई करावी व या अटीत बदल करावा. जेणेकरून अधिकाधिक योग्य आणि सक्षम उमेदवारांना या पदासाठी संधी मिळेल आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षमतेत सुधारणा होईल, ही विनंती.


मुंबई महापालिकेत 1846 पदांची भरती


मुंबई महानगरपालिकेतील विविध खात्यांच्या आस्थापनेवरील गट ‘क’ मधील रु. 25,500-81100 (पे मॅट्रिक्स-एम 15) अधिक अनुज्ञेय भत्ते या सुधारित वेतनश्रेणीतील ‘कार्यकारी सहायक’ (पूर्वीचे पदनाम: लिपिक) या संवर्गातील 1 हजार 846 रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 9 सप्टेंबरपर्यंत आहे.


हे ही वाचा :


BMC Recruitment 2024 : गुड न्यूज, मुंबई महापालिकेत 1846 जागांची मेगा भरती, 81 हजारांपर्यंत पगार, अर्ज कधी करायचा? जाणून घ्या सविस्तर