बदलापूर: बदलापूरमधील शाळेत चार वर्षांच्या चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेमुळे राज्यभरात सध्या संतापाचा आगडोंब उसळला आहे. मुलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे. अशातच आता अक्षय शिंदे याच्या आईवडिलांच्या दाव्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. 'एबीपी माझा'ने अक्षय शिंदे याच्या पालकांशी फोनवरुन संवाद साधला. त्यावेळी अक्षयच्या आईवडिलांनी अनेक महत्त्वाच्या गोष्टींबाबत माहिती दिली.
ज्या शाळेत चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाले त्याच शाळेत अक्षय शिंदे याचे कुटुंब काम करत होते. त्यांच्याकडे शाळेच्या साफसफाईचे काम होते. आम्ही शाळा सुटल्यानंतर संध्याकाळी साडेपाच वाजता शाळेत जायचो आणि सगळीकडे झाडू मारायचो. रात्री साधारण साडेआठ वाजता आम्ही झाडलोट करुन शाळेतून बाहेर पडायचो, अशी माहिती अक्षयच्या आईवडिलांनी दिली.
शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे होते का?
या प्रकरणाचा तपास एसआयटी पथकाकडे देण्यात आला आहे. या तपासात शाळेतील सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचा पुरावा ठरण्याची शक्यता आहे. याबाबत अक्षयच्या आईवडिलांना विचारण्यात आले. शाळेत आणि अक्षय काम करायचा त्या बाथरुमबाहेर सीसीटीव्ही कॅमेरा (CCTV) होता का, असा प्रश्न अक्षयच्या वडिलांना विचारण्यात आला. त्यावर वडिलांनी म्हटले की, हो शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे होते. अक्षय ज्या बाथरुमची साफसफाई करायचा तिकडेही सीसीटीव्ही होता, असे त्याच्या आईने सांगितले. अक्षय सकाळी 11 वाजता बाथरुम साफ करायचा. तो फक्त बाथरुम साफ करण्याचे काम करत होता, बाकी कोणतेही काम करत नव्हता, असेही अक्षयच्या आईने सांगितले.
शाळेत क्राईम ब्रांचचे अधिकारी दाखल
एसआयटी पथकाने बुधवारी बदलापूर पोलिसांकडून या प्रकरणाच्या तपासाची सूत्रं हातात घेतली होती. यानंतर गुरुवारी सकाळी
बदलापूरच्या आदर्श शाळेमध्ये भिवंडी क्राईम ब्रँच अधिकारी दाखल झाले आहेत. बदलापूरमधील आंदोलनाच्या दिवशी शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली होती. त्याचप्रमाणे नेमकं घटना काय घडलेले आहेत याबाबत त्यांची चौकशी सुरू आहे. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी शाळेतील सीसीटीव्ही फुटेज असलेला डीव्हीआर बॉक्स ताब्यात घेतला आहे. या सीसीटीव्ही फुटेजमधून महत्त्वाच्या गोष्टी समोर येऊ शकतात. त्यामुळे आता एसआयटी पुढे काय कारवाई करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
VIDEO: अक्षय शिंदेच्या आईवडिलांचा खळबळजनक दावा
आणखी वाचा