मुंबई : राज्यभरातील बेकायदेशीर होर्डिंग्जविरोधात सुस्वराज्य फाऊंडेशनच्यावतीनं दाखल जनहित याचिकेवर सुनावणी झाली. या सुनावणीत मुंबईतील एका नगरसेवकाच्यावतीनं करण्यात आलेला मुजोरपणा हायकोर्टाच्यासमोर आला.


अंधेरी पूर्वमधील भाजप नगरसेवक मुरजी पटेल व त्यांच्या कार्यकर्त्यांनी बेकायदेशीर होर्डिंग्ज लावून हायकोर्टाच्या आदेशाचा केवळ अवमानच केला नाही, तर यावर कारवाईसाठी गेलेल्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांना मारहाणही केली. ही बाब शुक्रवारच्या सुनावणीत पालिकेनं हायकोर्टाच्या निर्दशनास आणून दिली. याची अत्यंत गंभीर दखल घेतली हायकोर्टानं या नगरसेवकाविरुद्ध सोमवारी न्यायालय अवमान केल्याबद्दल ‘कारणे दाखवा’ नोटीस काढणार असल्याचे स्पष्ट संकेतही दिले.

‘भाजपचे नगरसेवक मुरजी पटेल व केसरबेन मुरजी पटेल यांच्या जीवनज्योती फाऊंडेशनतर्फे पालिका मैदानाबाहेर व फुटपाथवर बेकायदा होर्डिंग व बॅनर लावल्याची तक्रार पालिकेच्या ३० जानेवारी पालिकेच्या वेबसाईटमार्फत मिळाली होती. त्यानुसार, खातरजमा केल्यानंतर के वॉर्डातील लायसन्स इन्स्पेक्टर उत्तम सरवदे हे आपल्या सहकाऱ्यांसह कारवाईस गेले. पालिका अधिकारी हे होर्डिंग्ज काढत असताना पटेल यांचे समर्थक व भाजपचे कार्यकर्ते राजू सरोज, सुनील चिले, रोशन शेख, नरेश शेलार, महेश शिंदे, प्रकाश मुसळे, विशाल निचिते यांनी त्यांना प्रचंड शिवीगाळ करत पालिका कर्मचा-यांना मारहाणही केली’, असे महापालिकेने अवमान याचिकेद्वारे हायकोर्टाच्या निदर्शनास आणले. तसेच यासंदर्भातील फोटोही पुराव्यादाखल सादर केले आहेत.

पालिकेने यालंदर्भात फौजदारी खटला भरला असून त्यात आरोपींविरुद्ध आरोपपत्रही दाखल होईल. त्यामुळे याप्रकरणात दुहेरी कारवाई होणे योग्य नाही, असे म्हणणे प्रतिवादींच्या वकिलांनी मांडले. या भूमिकेबद्दल हायकोर्टाने तीव्र ताशेरे ओढले. "वास्तविक, सर्व कार्यकर्त्यांना असे बेकायदा कृत्य न करण्याबाबत आणि नागरिकांमध्येही न्यायालयाच्या आदेशांबाबत जनजागृती करण्याचे प्रयत्न लोकप्रतिनीधी या नात्यानं तुमच्याकडून होणं अपेक्षित होते. त्याउलट पालिका कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याचा प्रकार तुम्ही केला. हे अत्यंत गंभीर आहे. तुमची कृती केवळ फौजदारी स्वरुपातीलनसून न्यायालय अवमानाचीही आहे", असे निरीक्षण नोंदवून खंडपीठाने या सर्वांविरुद्ध न्यायालय अवमानाबद्दल ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्याचे स्पष्ट संकेत दिलेत.

दरम्यान, यावेळी पुण्यातील शनिवारवाडा परिसरात होर्डिंग लावण्याचा लोखंडी टॉवर कोसळून घडलेल्या भीषण अपघातात चार जण ठार झाल्याची माहितीही वकील उदय वारुंजीकर यांनी हायकोर्टाला दिली. त्याची दखल घेत याचा तपशील सोमवारी सादर करण्याचे तोंडी निर्देश हायकोर्टाने राज्य सरकारला दिलेत.