मुंबई : महानगरपालिकेच्या विविध रुग्णालये आणि विविध आरोग्य केंद्रामध्ये ऑक्सिजन निर्मिती यंत्रांचे कार्यान्वितीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी अंदाजपत्रकात बाजारमूल्यापेक्षा अधिक रक्कमेची तरतूद केल्याने मुंबई महानगरपालिकेचे 30 कोटींहून अतिरिक्त रुपये खर्च होत असल्याची तक्रार आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. पालिकेकडून अद्यापही निविदेत बाजी मारणाऱ्या कंत्राटदारांस कार्यादेश जारी करण्यात आले नाही, अशी माहिती या माहितीच्या अधिकारातून प्राप्त झाली आहे.


माहितीच्या अधिकारात विचारलेल्या विविध माहितीत कार्यकारी अभियंता शाम भारती यांनी अनिल गलगली यांस कळविले की, या प्रकरणात आजमितीस कोणतेही कार्यादेश देण्यात आले नाही. मेसर्स हायवे कन्स्ट्रक्शन कंपनी प्रतिसादात्मक असून 83.83 कोटी रक्कमेत काम देण्यात येणार आहे. सदर निविदा काढण्यापूर्वी पालिकेने आयआयटी किंवा अन्य सापेक्ष तांत्रिकदृष्टया योग्य असलेल्या संस्थेकडून मार्गदर्शन घेतले आहे का याची माहिती विचारली असता अनिल गलगली यांना नाही असे उत्तर देण्यात आले आहे.


अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आयुक्त इकबालसिंह चहल यांस पाठविलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, 850 लिटर क्षमतेचे ऑक्सिजन निर्मिती यंत्रांची किंमत ही बाजारात रुपये 65 लाखापर्यंत आहे. लिटर क्षमतेत वाढ झाल्यास काही प्रमाणात किंमत वाढते. पालिकेने रुपये 86.42 कोटी इतक्या रक्कमेचे अंदाजपत्रक तयार केले. निविदा प्रक्रियेत मेसर्स हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीने रुपये 92.85 कोटींची रक्कम उद्युत केली. वाटाघाटी करण्याच्या नावावर रुपये 9.02 कोटी इतकी सवलत दाखवित अखेर हे काम रुपये 83.83 कोटींस प्रदान करण्यात आले. याकामी मुख्यमंत्री सचिवालयातून सूत्रे हलविण्यात आल्याने पालिकेने विशेष स्वारस्य घेतले नाही.


या सर्व ऑक्सिजन निर्मिती यंत्रणेचे पुरवठा, प्रस्थापना, चाचणी व कार्यान्वितीकरण करण्यासाठी रुपये 77.15 कोटी रक्कम दाखविण्यात आली. वार्षिक प्रचलनावर रुपये 1.31 कोटी रुपये दर्शविण्यात आले आहे. पुढील पाच वर्ष बहुव्यापक सर्वसमावेक्षक संधारण व परिरक्षण करण्याकरिता रुपये 5.36 कोटी असे सर्व मिळून रुपये 83.83 कोटींची शिफारस करण्यात आली. 


जेव्हा अंदाजपत्रक फुगवून बनविण्यात आले तेव्हा अशी रुपये 9 कोटींची सवलत कोणीही देऊ शकतो असा सवाल अनिल गलगली यांनी केला. ते म्हणाले की, जेव्हा बाजारात कमी किंमतीत ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा आहे मग विशिष्ट कंत्राटदारांकडून अवाढव्य किंमतीत ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा घेणे ही चुकीची बाब आहे. अंदाजपत्रक ज्यावेळी बनविण्यात येते तेव्हा बाजारात एक फेरफटका मारुन किंमती समजून घेण्याचा छोटासा प्रयत्न केला असता तर आज पालिकेचे रुपये 30 कोटी सहजरित्या वाचले असते.


महत्वाच्या बातम्या :