मुंबई : मुंबईत पार्किंगला जागाच नसताना अनधिकृत पार्किंगसाठी दंड वाढवण्याची घाई मुंबई महापालिकेला झाल्याचं चित्र आहे. बीएमसी आयुक्त प्रवीण परदेशींच्या नव्या पार्किंग पॉलिसीला विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनीही विरोध दर्शवला आहे.

काही दिवसांपूर्वी महापालिका आयुक्त प्रवीण परदेशींनी मुख्य रस्त्याला लागून असलेल्या रस्त्यावर आणि वाहनतळापासून 1 किमीच्या परिसरात अनधिकृत पार्किंग केल्यास 1 ते 10 हजार दंड आकारण्यासंदर्भात निर्देश जारी केले होते. मात्र, मुंबई महापालिका सभागृहात आज या पार्किंगच्या मुद्द्यावरुन सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं.

एकीकडे मुंबईसारख्या शहरात अपुऱ्या जागेत राहणाऱ्या आणि वाहतूक कोंडीला कंटाळलेल्या मुंबईकरांना पार्किंगसाठी जागा शोधणे महामुश्किल असते. त्यातच, मुंबई महापालिकेच्या पे अँन्ड पार्कच्या जागा चुकीच्या ठिकाणी म्हणजेच बाजारपेठा, रेल्वे स्टेशन, रहदारीची ठिकाणे यापासून बरीच लांब आहेत.

मुंबई महापालिकेने 2009 च्या पॉलिसीनुसार बिल्डरांना पे अँन्ड पार्कसाठी 100% एफएसआय उपलब्ध करुन दिला. मात्र, महापालिकेने बिल्डरकडून या पे अँन्ड पार्कच्या बराचशा जागा अद्याप ताब्यात घेतल्या नसल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

त्यामुळे, मुंबई महापालिकेत मोठा पे अँन्ड पार्कचा घोटाळा झाल्याचा आरोपही विरोधकांनी केला आहे. पार्किंगसाठी आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या पॉलिसीबाबत प्रशासनाने सत्ताधाऱ्यांना विश्वासात घेतले नसल्याने शिवसेनेचाही या पार्किंग पॉलिसीला विरोध आहे.