मुंबई: बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील गंगा नदीवरील कोसळलेल्या पुलाचं (bihar bridge collapse) काम करणाऱ्या कंपनीलाच मुंबईतील गोरेगाव मुलुंड लिंक रोडवरील उड्डाणपुलाचे आणि उन्नत मार्गामधील पुलांची काम देण्यात आली आहेत. त्यामुळे यासंबंधीत कंपनीला कंत्राट देण्यावरून राजकारण तापल्याचं दिसत आहे. हे कंत्राट देण्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या कंपनीचे कंत्राट रद्द करावे आणि संबधीत कंपनीला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी काँग्रेससह भाजपने मुंबई महापालिका आयुक्तांकडे केली आहे.


बिहारमधील घटनेची पुनरावृत्ती मुंबईतील प्रकल्पांमध्ये होऊ नये यासाठी खबरदारी घ्यावी, अशा सूचना राजकीय पक्षांकडून करण्यात येत आहे. तर या प्रकल्पाचे डिझाईन आयआयटी मुंबईकडून करण्यात आलं आहे, बिहारच्या घटनेचा पुढचा अहवाल आल्यानतंर त्यावर विचार करु अशी प्रतिक्रिया मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली आहे. 


रविवारी, 4 जून रोजी बिहार मधील गंगा नदीवरच्या पूल कोसळण्याच्या दृश्याने अनेकांचा थरकाप उडवला. या निर्माणाधीन फुलाचं काम ज्या कंपनीकडे होतं त्याच एस पी सिंगला (sp singla construction) या कंपनीकडून मागील वर्षभरापासून मुंबईतील महत्त्वाकांक्षी अशा गोरेगाव मुलुंड लिंक रोडवरील उड्डाणपूल आणि उन्नत मार्गावरील पूलांची कामं केली जात आहेत. त्यामुळे थरकाप उडवणाऱ्या बिहारमधील या दृश्यानंतर मुंबई महापालिकेने खबरदारी घेऊन या संबंधित कंपनीला दिलेले कंत्राट रद्द करावेत अशी मागणी काँग्रेस, भाजप या राजकीय पक्षांकडून केली जात आहे. 


एस पी सिंगला ही कंपनी 2014 पासून बिहारमध्ये गंगा नदीवर पूल तयार करण्याचं काम करत होती. गोरेगाव-मुलुंड लिंक रोडवरील उड्डाण पूल आणि उन्नत मार्गामध्ये पुलाची कामे करण्यासंबंधी याच कंपनीला कंत्राट देण्यात यावे याबाबत डिसेंबर 2021 मध्ये बीएमसी स्थायी समितीकडून प्रस्ताव मंजूर करण्यात आला. जानेवारी 2022 मध्ये या कंपनीला वर्क ऑर्डर देण्यात आली. त्यानंतर मार्च 2022 मध्ये या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आलं. जवळपास 800 कोटी रुपयांचा हा प्रकल्प असल्याची माहिती आहे.


मात्र मागील वर्षापासून  सुरू असलेले काम या कंपनीकडून काढून घेण्यात यावं, अशी विनंती पत्राद्वारे केली जात आहे. तर भाजपनेसुद्धा यासंबंधी मुंबई महापालिकेने चौकशी करून हे कंत्राट या कंपनीला देऊ नये, अशी मागणी केली. या कंपनीला हे कंत्राट देण्याची चूक तत्कालीन सत्ताधारी असलेल्या शिवसेनेने केलं असल्याचा आरोप भाजप आमदार राम कदम यांनी केला आहे.


आतापर्यंत या कंपनीकडून गोरेगाव मुलुंड लिंक रोडवरील 20 टक्के काम पूर्ण झालं आहे. या संबंधित कंपनीला बिहारमध्ये काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू आहे. 


महापालिका आयुक्तांची प्रतिक्रिया 


या साऱ्या प्रकरणावर मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, गोरेगाव मुलुंड लिंक रोडमधील उड्डाणपुलाचे काम या संबंधित कंपनीला दिले आहे. बिहारमध्ये आणि आपल्यामध्ये फरक एवढा आहे की बिहारमध्ये पूल दोनदा कोसळला आहे. आपण जो ब्रिज या कंपनीद्वारे तयार करतोय तो ब्रिज मुंबई आयआयटीने डिझाईन केलेला आहे आणि सर्व डिझाइन मंजूर केलेलं आहे. प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट या प्रकल्पामध्ये लावण्यात आलेलं आहे. या माध्यमातून डिझाईन नुसार काम सुरू आहे की नाही याची पाहणी केली जाते. त्यामुळे आपल्या ब्रिजमध्ये कुठलाही प्रॉब्लेम नाहीये. त्यामुळे हे काम सुरू राहील. 


इकबाल सिंह चहल पुढे म्हणाले की, बिहारमधील घटनेचा रिपोर्ट आल्यानंतर आम्ही त्याचा अभ्यास करू जो निष्कर्ष समोर येईल त्यानंतर पुढील निर्णय घेऊ. बातम्यांमध्ये वाचल्यानंतर आम्ही आमचा पुलाचा काम बंद करू शकत नाही. ब्लॅक लिस्ट केल्यानंतर त्याचं कारण समोर येईल आणि हा अहवाल समोर आल्यानंतर आम्ही पुढची कारवाई करू. 


ही बातमी वाचा :