मुंबई: मुंबई महानगरपालिकेचे (BMC) माजी आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्ती (Additional Chief Secretary) करण्यात आली आहे. तर माजी अतिरिक्त मुख्य सचिव मुंबई महापालिका (प्रकल्प) पी वेलरासू यांची नियुक्ती सचिव, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय निवडणूक आयोगाच्या (Election Commission) आदेशानंतर इक्बाल सिंह चहल यांना मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदावरुन दूर करण्यात आले होते. तेव्हापासून चहल यांची कोणत्या नव्या पदावर वर्णी लागणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अखेर त्यांच्याकडे मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
पालिका आयुक्त असताना विरोधकांची टीका
इक्बाल सिंह चहल हे कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त होते. या काळात पालिकेने काढलेली कंत्राटे आणि अन्य मुद्द्यांवरुन तत्कालीन विरोधी पक्ष असलेल्या भाजपने चहल यांच्यावर अनेक आरोप केले होते. भाजपकडून मुंबई महानगरपालिकेच्या कथित भ्रष्ट कार्यपद्धतीवर बोट ठेवण्यात आले होते. मात्र, राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर इक्बाल सिंह चहल यांनी त्यांच्याशी सहजपणे जुळवून घेतले होते. नुकत्याच सुरु झालेल्या नरिमन पॉईंट ते वरळी सागरी सेतू प्रकल्पासाठी त्यांनी उल्लेखनीय काम केले होते. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या जलद कार्यपद्धतीचे जाहीरपणे विशेष कौतुक केले होते.
मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी भूषण गगराणी
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर चहल यांना मुंबई महालिकेच्या आयुक्तपदावरून दूर केल्यानंतर ही जाबाबदारी भूषण गगराणी यांच्यावर सोपवण्यात आली आहे. गगराणी यांच्यासोबतच ठाणे महापालिकेच्या आयु्क्तपदी सौरभ राव, नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी कैलाश शिंदे यांची नियु्क्ती करण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाने काय आदेश दिला होता?
ज्या शासकीय अधिकाऱ्या आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी सेवेची तीन वर्षे पूर्ण केलेली आहेत, त्या अधिकाऱ्याची बदली करावी, अशा सूचना निवडणूक आयोगाने महाराष्ट्र सरकारला दिल्या होत्या. सरकारने मात्र यावर कोणतीही कारवाई केली नव्हती. मात्र निवडणूक आयोगाने ठणकावल्यानंतर चहल यांच्यासह आश्विनी भिडे आणि पी. वेलारुसू यांचीही बदली करण्यात आली होती.
हेही वाचा >>
Bhushan Gagrani | मोठी बातमी! मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी भूषण गगराणी यांची नियुक्ती