मुंबई: यंदाच्या मुंबई महापालिका निवडणुकीत वॉर्ड पुनर्रचना आणि आरक्षणामुळे अनेक उमेदवारंचा पत्ता कट झाला आहे. त्यामुळे ज्या विद्यमान नगरसेवकांचा प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाला आहे, त्या नगसेवकांनी आपल्या पत्नीला पुढे केले आहे. तसेच काहींनी महापालिकेत पुन्हा प्रवेश मिळवण्यासाठी इतर प्रभागांचा शोध सुरु केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केलेल्या आपल्या पहिल्या यादीतही दोन विद्यमान नगरसेवकांच्या पत्नींना उमेदवारी दिली गेली आहे. त्यामुळे निवडणुकीतील नेहमी वापरल्या जाणाऱ्या युक्त्या वापरुनच वॉर्ड महिला आरक्षित झाला, तरी आपल्याच अंमलाखाली ठेवण्याचा प्रयत्न जुने खेळाडू करताना दिसत आहेत.

प्रभाग क्रमांक 215 ताडदेव मुंबई हा महिला सर्वसाधारण वर्गसाठी आरक्षित आहे. त्यामुळे या प्रभागाचे नेतृत्व करणारे शिवसेनेचे नगरसेवक अरविंद दुधवडकर यांनी आपली पत्नी अरुंधती दुधवडकर यांना उभे करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

तर राष्ट्रवादी काँग्रेसचे चंदन शर्मा यांनी आपला प्रभाग  ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने, त्यांनी आपली पत्नी चारु चंदन शर्मा यांना प्रभाग क्रमांक 120 सूर्यनगर विक्रोळी हा महिला सर्वसामान्य प्रवर्गासाठी राखीव असल्याने तिथून निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे.

त्याचप्रकारे मनसेचे सुधीर जाधव यांच्या पत्नी आणि तीनवेळा नगरसेविका राहिलेल्या स्नेहल जाधव या प्रभाग क्रमांक 192 मधून निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. तसेच शिवसेनेचे राजू पेडणेकर यांचा प्रभाग क्रमांक 61 महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने, येथून ते आपल्या पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे.

प्रभाग क्रमांक 111 कांजूरमार्ग भांडूप गाव महिला सर्वसाधारण वर्गासाठी राखीव झाल्याने येथून राष्ट्रवादीचे धनंजय पिसाळ आपल्या पत्नी भारती पिसाळ यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवणार आहेत. तसेच ते स्वत: विक्रोळी प्रभाग क्रमांक 114 किंवा प्रभाग क्रमांक 115 मधून निवडणूक लढवणार आहेत.

प्रभाग क्रमांक 45 मालाड पूर्वमधून विनोद शेलार आपल्या पत्नीला निवडणुकीच्या मैदानात उतरवणार आहेत. अन् ते स्वत: प्रभाग क्रमांक 51 गोरेगांव पूर्वमधून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे हारुण खान यांचा प्रभाग क्रमांक 124 सर्वसामान्य महिला वर्गासाठी आरक्षित झाल्याने, येथून ते आपल्या पत्नी ज्योती हारुन खान यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवणार आहेत. तर काँग्रेसचे नगरसेवक मोहसीन हैदर यांचा प्रभाग क्रमांक 66 सर्वसामान्य महिला वर्गासाठी राखीव झाल्याने तेही तिथून आपल्या पत्नीला उतरवण्याची शक्यता व्यक्त होत आहे.