मुंबई महापालिकेची मुदत आज संपणार आहे. निवडणूक न झाल्याने मुंबई महानगरपालिकेवर प्रशासक नेमण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या आहेत की, निवडणूक झाल्यानंतर शिवसेनेचीच सत्ता येईल. तसेच मुंबईत आमचा भगवाच राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 


महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत की, ''ज्या पद्धतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे काम करत आहेत. त्यामुळे किमान मुंबईमध्ये शिवसेनेची सत्ता येणारच.'' मुंबईकर आमच्या सोबत असल्याचेही त्या म्हणाल्या आहेत. यावेळी मुंबईत शिवसेनेची सत्ता आल्यास महापौर तुम्हीच होणार का? असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला. यावर बोलताना त्या म्हणाले आहेत की, महापौर शिवसेनेचाच होईल. ती मी असेल किंवा दुसरं कोणी हे पक्ष प्रमुख ठरवणार.         


यशवंत जाधव हे भीम सैनिक, ते लढतील - महापौर 


शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरी पडलेल्या ईडीच्या धाडीवर त्या म्हणाले आहेत की, ज्यांच्यावर धाडी पडल्या किंवा पडणार होत्या ते भाजपात गेले साधू झाले, शुद्ध झाले. पर्याय असा आहे की, एक तर आमच्यात या नाही तर हे (कारवाईला तयार रहा) घ्या. मात्र आम्ही सैनिक आहोत. यशवंत जाधव हे भीम सैनिक आहेत, भीम पुत्र आहेत. ते लढतील. जे सत्य आहे ते लवकरच सर्वांसमोर येईल. ही कायद्याची आणि कागदाची लढाई असल्याचे त्या म्हणाल्या आहेत.       


इतर महत्वाच्या बातम्या