मुंबई : एमएमआरडीए आणि मुंबई मेट्रोची कामं सुरु असताना पावसाळ्यात पाण्याचा निचरा प्रभावीपणे व्हावा, यासाठी मुंबई महापालिकेच्या बैठकीत काही निर्णय घेण्यात आले.

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात 'मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळ मर्यादित' आणि 'मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण' (MMRDA) यांच्याद्वारे विविध कामे सुरु आहेत. ही कामं सुरु असताना पावसाच्या पाण्याचा अधिक प्रभावीपणे निचरा होणे आवश्यक आहे. या अनुषंगाने वरिष्ठ अधिकाऱ्यांची समन्वय बैठक महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांच्यासोबत महापालिका मुख्यालयात झाली.

बैठकीत झालेले निर्णय

मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाद्वारे ज्या ठिकाणी कामे चालू आहेत आणि ज्या ठिकाणी पाणी साचू शकतं, तिथे मेट्रो रेल्वेद्वारे 241 पंप बसवण्यात येतील, अशी हमी मेट्रो रेल्वेद्वारे देण्यात आली. या व्यतिरिक्त पावसाच्या पाण्याचा अधिक प्रभावीपणे निचरा होण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेद्वारे यावर्षी 295 पंप बसवण्याची प्राथमिक कार्यवाही आता पूर्ण झाली आहे.

यानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून यावर्षीच्या पावसाळ्यात बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळ यांच्याद्वारे एकूण 536 पंप बसवण्यात येणार आहेत.

गेल्या वर्षी ज्या-ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यास तुलनेने अधिक कालावधी लागला होता, त्या-त्या ठिकाणी पाण्याचा निचरा अधिक प्रभावीपणे व्हावा, यासाठी अधिक काळजी घेण्याबाबत चर्चा करण्यात आली.

ज्या ठिकाणी अडचणी उद्भवू शकतात, अशा ठिकाणी संबंधित यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी संयुक्त पाहणी दौरा करुन आवश्यक तो निर्णय घेतील.

एमएमआरडीए आणि मेट्रो यांच्या स्तरावर समन्वय साधला जावा, यासाठी या दोन्ही संस्था समन्वय अधिकाऱ्यांची (नोडल ऑफीसर) यांची नेमणूक करतील.

पावसाळ्याच्या काळात समन्वयनाच्या दृष्टीने अडचणींचे निराकरण अधिक प्रभावीपणे करता यावे, यासाठी बृहन्मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाच्या धर्तीवर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळ यांच्या स्तरावरही आठवड्याचे सातही दिवस आणि दिवसाचे २४ तास कार्यरत राहणारा नियंत्रण कक्ष सुरु करण्यात येणार.

मुंबई सेंट्रल, कफ परेड, विधान भवन, चर्चगेट, हुतात्मा चौक येथील पर्जन्यजल वाहिन्या मेट्रो स्टेशनच्या कामांसाठी वळवण्यात येणार आहेत. हे काम आता अंतिम टप्प्यात असून ते 31 मे पर्यंत पूर्ण होईल, अशी ग्वाही मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाद्वारे देण्यात आली.

पश्चिम द्रुतगती महामार्गावरील, तसेच दहिसर ते अंधेरी दरम्यानच्या लिंक रोडवरील मेट्रो खांबांच्या भोवताली पाणी साचणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळ यांना देण्यात आल्या.

पश्चिम उपनगरांमधील नाले व कल्व्हर्टच्या सफाई कामांचा आढावा घेण्यात आला.

अतिवृष्टी उद्भवल्यास त्या दरम्यान बृहन्मुंबई महापालिकेचे अधिकारी प्रत्यक्ष ठिकाणी (फिल्डवर) जाऊन आवश्यक ती कार्यवाही करतात. यावर्षीच्या पावसाळ्यापासून महापालिकेच्या अधिकाऱ्यांप्रमाणेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाचे संबंधित अधिकारीही प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन आवश्यक ती कार्यवाही करणार आहेत. तसेच गरजेनुसार वरिष्ठ स्तरावर देखील नियमित संपर्क राहणार आहेत.