मुंबई : भेंडीबाजार येथील दाटीवाटीच्या जागेतील जुन्या इमारतींचा, चाळींचा विकास करण्यासाठी सरकारने क्लस्टर डेव्हलपमेंट योजना पुढे आणली. या प्रकल्पासाठी सैफी बुऱ्हानी अपलिफ्टमेंट ट्रस्टतर्फे (Saifee Burhani Upliftment Trust) विकासकाम केले जाणार आहे. या क्लस्टर प्रकल्पासाठी ट्रस्टला महापालिकेकडून भूखंडाची आवश्यकता आहे. परंतु भूखंड देण्यास महापालिकेने विरोध दर्शवला आहे.

या ट्रस्टला क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी पालिकेच्या 23 छोट्या भूखंडांची आवश्यकता आहे. त्या बदल्यात ट्रस्ट पालिकेला 2 मोठे भूखंड आणि 11 कोटी रुपये देण्यास तयार आहे. मात्र हा तोट्याचा सौदा आहे. कारण, पालिकेचे 23 भूखंड हे मोक्याच्या जागेवर आहेत. त्यावर केवळ 150 भाडेकरु राहतात. तर पालिकेला देण्यात येणाऱ्या 2 भूखंडांवर 450 भाडेकरु राहतात. त्यामुळे त्यांची सर्व जबाबदारी पालिकेवर पडणार आहे. तसेच पालिकेला देण्यात येणारे भूखंड मुंबईतील फार महत्त्वाच्या जागेवर (तुलनेने स्वस्त जागेवर आहेत) नाहीत. त्यामुळे पालिकेसाठी हा व्यवहार तोट्याचा ठरेल.

या क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्पात विकासकाचा हजारो कोटी रुपयांचा फायदा होणार आहे. तर पालिकेला बदल्यात केवळ 11 कोटी रुपये मिळणार आहेत. हा पालिकेसाठी अत्यंत तोट्याचा सौदा असल्याचे सांगत सर्वपक्षीय नगरसेवकांनी या भूखंडांच्या अदलाबदलीच्या प्रस्तावाला सुधार समितीच्या बैठकीत विरोध दर्शवला आहे. त्यामुळे सुधार समिती अध्यक्ष सदानंद परब यांनी हा प्रस्ताव मंजूर न करता राखून ठेवला आहे.

पालिकेच्या जागेवर किती इमारती व त्यात किती फ्लॅट उपलब्ध होणार आणि ट्रस्टने दिलेल्या जागेत किती इमारती व फ्लॅट उपल्बध होणार हे पाहायला हवे, असे सांगत सर्वपक्षीय नगरसेवकांनी या प्रस्तावाला विरोध दर्शवला.