मुंबई : दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध लिओपोल्ड कॅफेच्या अनधिकृत बांधकामावर अखेर मुंबई महापालिकेने हातोडा चालवला आहे. लिओपोल्ड कॅफे हे मुंबईतील सर्वात जुनं आणि सुप्रसिद्ध हॉटेल आहे.
लिओपोल्ड कॅफेने महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता फूटपाथ अडवून ठेवला होता. फूटपाथवरच पिलर उभारत नवं छत बांधण्याचाही लिओपोल्ड कॅफे प्रशासनाचा प्रयत्न होता.
मुंबई महापालिकेने लिओपोल्ड कॅफेला काल '354 ए' ची नोटीस बजावली होती. कोणत्या परवानगीनुसार हे पिलर उभारण्यात आले, याचं उत्तर 24 तासांच्या मुदतीत देण्यास पालिकेने सांगितलं होतं. लिओपोल्ड कॅफेकडून नोटिशीला कोणतेही उत्तर न मिळाल्यामुळे अखेर हे वाढीव बांधकाम तोडण्यात आलं.
मुंबईतील 26/11 च्या हल्ल्यावेळी दहशतवाद्यांनी लिओपोल्ड कॅफेमध्ये घुसून गोळीबार केला होता.