मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 1 मे 2021 पासून 18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. मात्र यानंतर अनेक ठिकाणी लसीकरणासाठी नागरिक गर्दी करीत आहे. या गर्दीमुळे सामाजिक दुरीकरण कठीण होण्यासह कोविड प्रतिबंधाच्या दृष्टीने आवश्यक असणारी काळजी घेतली जाणे देखील कठीण होत आहे. ही बाब लक्षात घेऊन गर्दी टाळण्याच्या दृष्टीने व नागरिकांना देखील सुलभतेने लसीकरण करता यावे, या उद्देशाने ज्या नागरिकांची 'कोविन ॲप' वर नोंदणी झालेली आहे, तसेच ज्यांना संबंधित लसीकरण केंद्रावर जो मिळालेल्या 'अपॉइंटमेंट स्लॉट' अनुसारच लसीकरण करण्याचे आदेश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी आज दिले आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण हे दिनांक 16 जानेवारी 2021 पासून नियमितपणे राबविण्यात येत आहे. यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात साधारणपणे १४७ लसीकरण केंद्रे ही लशींच्या साठा उपलब्धतेनुसार कार्यरत आहेत.
गेले काही दिवस बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध लसीकरण केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. यामुळे सोशल डिस्टन्सिंगसारख्या कोविड प्रतिबंधात्मक बाबींची अंमलबजावणी योग्यरीत्या होणे कठीण होऊ शकते.यामुळे आता केवळ 'कोविन ॲप' किंवा 'कोविन पोर्टल' यावर यशस्वीरित्या नोंदणी झाल्यावर 'अपॉइंटमेंट स्लॉट' मिळालेल्या व्यक्तींचेच लसीकरण करण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. यानुसार सर्व लसीकरण केंद्रांवर संबंधित बाबींची पडताळणी केल्यानंतरच नागरिकांना लसीकरण केंद्रात प्रवेश द्यावा, असे आदेश आज सर्व संबंधितांना देण्यात आले आहेत.
पडताळणी केल्यानंतरच लसीकरण केंद्रात प्रवेश
1. वय वर्षे 45 पेक्षा अधिक वय असणाऱ्या ज्या व्यक्तींना कोव्हॅक्सिन लशीचा दुसरा डोस घ्यावयाचा आहे, अशा व्यक्तींनी त्यांच्या पहिल्या लसीकरणाचे प्रमाणपत्र हे 'हार्ड कॉपी' किंवा 'सॉफ्ट कॉपी' स्वरूपात सादर केल्यानंतर लसीकरण केंद्राच्या व्यवस्थापकांनी सदर बाबींची योग्य ती पडताळणी केल्यानंतर लसीकरण केंद्रात प्रवेश देण्यात येईल.
2. आरोग्य कर्मचारी (Health Care Worker) किंवा आघाडीवर काम करणारे कर्मचारी (Frontline worker) यांच्याबाबत ज्यांना कोव्हॅक्सिन किंवा कोविशिल्ड या लसीचा दुसरा डोस घ्यावयाचा आहे अशा व्यक्ती. तसेच आरोग्य कर्मचारी (Health Care Worker) किंवा आघाडीवर काम करणारे कर्मचारी (Frontline worker) यांच्याबाबत लसीचा दुसरा डोस घ्यावयाचा असल्यास अशा व्यक्तींच्या बाबत त्यांच्या नियोक्त्याने (Employer) अधिकृतपणे प्रमाणित केलेले निर्धारित नमुन्यातील पत्र याची पडताळणी केल्यानंतरच लसीकरण केंद्रात प्रवेश देण्यात येईल.