Sanjay Jaiswal's Investment on Wife's Name : महापालिकेतील कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी (Covid Center Scam) IAS अधिकारी संजीव जयस्वाल (Sanjay Jaiswal) यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. संजीव जयस्वाल यांनी कोविड-19 कालावधीत त्यांच्या पत्नीच्या नावावर गुंतवणूक केल्याचं समोर आलं आहे. संजीव जयस्वाल यांनी 2020 मध्ये त्यांच्या पत्नीच्या नावावर 5 कोटी रुपये फिक्स्ह डिपॉझिटमध्ये गुंतवल्याची माहिती समोर आली आहे. आयएएस अधिकारी संजीव जयस्वाल यांची शुक्रवारी ईडी कार्यालयात जवळपास 10 तास चौकशी करण्यात आली. 


संजीव जयस्वाल यांची पत्नीच्या नावे 5 कोटींची गुंतवणूक


संजीव जयस्वाल यांना कथित कोविड जंबो सेंटर्स घोटाळ्याच्या चौकशीचा एक भाग म्हणून ईडीकडून समन्स देऊन चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. अंमलबजावणी संचालनालयाच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, जयस्वाल यांनी कोविड-19 कालावधीत वर्ष 2020 मध्ये त्यांच्या पत्नीच्या नावावर 5 कोटी रुपये फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतवले आहेत. ईडीचे आधिकारी एफडीमध्ये गुंतवलेल्या पैशाचा स्रोत शोधण्याचा प्रयत्न करत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. जयस्वाल यांनी मुदत ठेवीमध्ये एकूण 15 कोटी रुपये गुंतवले होते जे तपासात आढळून आलं आहे. पण त्यांनी कोविड-19 कालावधीत गुंतवलेल्या 5 कोटी रुपयांचा ईडी शोध घेत आहे.


लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसच्या कंत्राटावरही प्रश्न


ईडीने जयस्वाल यांना वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले, यामध्ये बहुतेक त्यांच्या मालमत्तेशी संबंधित होते. यादरम्यान, दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे जयस्वाल यांनी कोविड कालावधीत कोविड सेंटरसाठी लाइफलाइन हॉस्पिटल मानजमेंट सर्विसला दिलेला करार. या कराराबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आले. त्यांनी कोणत्या आधारे हा करार केला, असा प्रश्नही ईडीने उपस्थित केला. खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या सह-मालकीच्या लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस या फर्मला कंत्राट देण्याच्या प्रक्रियेत सहभागी असलेल्या संजीव जयस्वाल हे काही प्रमुख स्वाक्षऱ्यांपैकी एक होते.


ईडी अधिकाऱ्यांकडून तपास सुरु


संजीव जयस्वाल यांनी लाईफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसला कंत्राट देण्यासाठी कंत्राटदारांकडून काही रोख किंवा लाच घेतली आहे का किंवा त्याने कोणाच्या प्रभावाखाली किंवा दबावाखाली काम केले आहे का, पाटकर यांच्या फर्मला कंत्राट देताना कोणते निकष पाळले गेले, याचा शोध ईडीचे अधिकारी घेत आहेत.


संजय जयस्वाल यांनी पुन्हा चौकशी होणार : सूत्र


ईडीने पालिका उपायुक्त रमाकांत बिरादार आणि इतर पालिका अधिकाऱ्यांचे जबाबही नोंदवले आहेत.  याशिवाय पाटकर वगळता लाईफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसच्या अन्य तीन सहमालकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.  त्यांना दुसऱ्या फेरीच्या चौकशीसाठी पुन्हा बोलावले जाईल, अशी माहिती ईडीच्या सुत्रांनी दिली आहे.