मुंबई : गेल्या अनेक महिन्यांनंतर कोरोनाच्या एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या रुग्णाचा मृत्यू जुलैमध्ये झाला होता, परंतु आता अधिकृत नोंदींमध्ये त्याचा आता समावेश करण्यात आला आहे अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) दिली आहे. या रुग्णाला ओमायक्रॉनच्या (Omicron) सब व्हेरियंटची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. 

Continues below advertisement


मृत व्यक्ती 75 वर्षीय मुंबईतील रहिवासी असून त्याला यकृताचा कर्करोग झाला होता. त्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असली तरी हा व्हायरल त्याच्या प्राथमिक मृत्यूसाठी जबाबदार नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. 


दरम्यान, मुंबईत 10 नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे एकूण संसर्ग संख्या 11,64,108 वर पोहोचली. तर ताज्या मृत्यूने एकूण मृत्यूची संख्या 19,776 वर नेली. ऑगस्ट महिन्यामधील ही दुसरी वेळ आहे की शहरात कोविड प्रकरणे दुहेरी अंकात नोंदली गेली आहेत; यापूर्वीची घटना 6 ऑगस्ट रोजी घडली होती.


रुग्ण बरे होण्याचा दर वाढत असून त्यामुळे चिंतेचं कोणतंही कारण नाही. आज आणखी चार रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. एकूण बरे झालेल्यांची संख्या 11,44,285 झाली आहे. सध्या मुंबईत 47 सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत एकूण 292 चाचण्या घेण्यात आल्या, त्यामुळे एकूण चाचणी संख्या 1,89,17,951 झाली.


नवीन कोविड प्रकाराचा उदय?


काही नमुन्यांमध्ये आढळलेल्या ओमिक्रॉन उप-प्रकार, EG.5.1 मुळे महाराष्ट्रात कोविड प्रकरणांमध्ये वाढ होण्याचे संकेत असले तरी, आरोग्य तज्ञांनी तात्काळ चिंतेचे कारण नाही असं स्पष्ट केलं आहे. या उप-प्रकाराचा शोध लागल्यापासून कोणतीही लक्षणीय वाढ दिसून आली नाही.


राज्याच्या आरोग्य विभागाने म्हटले आहे की नवीन उप-प्रकारांमुळे प्रकरणांमध्ये वाढ झाल्याच्या गोष्टीला काही पुरावा नाही. यावर अधिक अभ्यास करण्यासाठी येत्या आठवड्यात परिस्थितीचे काळजीपूर्वक निरीक्षण केले जाईल. कारण सर्व श्वसन संक्रमण सामान्यत: जून ते सप्टेंबर दरम्यान वाढलेले दिसून येते असं चित्र आहे. 


दरम्यान, राज्यातील 16 टक्के कुटुंबात संसर्गजन्य किंवा कोव्हिडसारखी लक्षणे आढळत आहेत. केवळ मुंबईतच नाही तर संपूर्ण राज्यातवायरल फिव्हरच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. एका राष्ट्रीय सर्व्हेक्षणात असं आढळलं आहे की, अनेक घरांमध्ये एकापेक्षा जास्त सर्दी, ताप आणि खोकल्याची रुग्ण आढळत आहेत. मात्र, लक्षणे रुग्णालयात भर्ती करण्याइतकी गंभीर नसल्याचं देखील आढळून आलं आहे. 


ही बातमी वाचा :