मुंबई : कामाच्या वेळेत क्रिकेट खेळणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा मुंबईकरांनी आज निषेध नोंदवला. 'फ्री अ बिलीयन' या संस्थेनं जी नॉर्थ विभागाबाहेरच्या फुटपाथवर फेरीवाल्यांची दुकानं लावत आंदोलन केलं.

जी-नॉर्थ भागात अतिक्रमण केलेले फुटपाथ आणि फेरीवाल्यांचा प्रश्न कुटील झाला आहे. मात्र ज्या अधिकाऱ्यांकडे फेरीवाल्यांना चाप लावण्याचं काम आहे, तेच अधिकारी काल कामाच्या वेळेत क्रिकेट खेळण्यात व्यस्त होते.

काम सोडून क्रिकेट खेळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होईल, असं आश्वासन पालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी दिलं आहे. मुंबईतले खड्डे बुजवण्यासाठी दिलेली डेडलाईन संपल्यानंतर पालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी दादरमध्ये खड्ड्यांची पाहणी केली, त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिलं.

दरम्यान, मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरुन मनसे आक्रमक झाली आहे. दिवाळीपर्यंत खड्डे बुजवले नाहीत, तर 'मी खड्ड्यांना जबाबदार' असा फलक आयुक्तांच्या हातात देऊन त्यांनाच रस्त्यात उभं करण्याचा इशारा मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडे यांनी दिला आहे.

मुंबईतले खड्डे बुजवण्यासाठी दिलेली डेडलाईन संपल्यानंतर पालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी दादर परिसरात खड्ड्यांची पाहणी केली. रोड चिफ इंजिनिअर संजय दराडे यांच्यासोबत त्यांनी ही पाहणी केली.

मुंबईच्या खड्ड्यावरुन पालिकेत सध्या चांगलंच रणकंदन सुरु आहे. नागरिकांनाही या खड्ड्यामुळे चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. मनसेने एका अभियंत्याच्या हातात अभियंते खड्ड्यांना दोषी असल्याचा फलक दिल्याने याप्रकरणी चांगलाच भडका उडाला होता. या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी सोमवारपर्यंतची डेडलाईन दिली होती.