मुंबई : महापालिका प्रशासन मान्सूनसाठी सज्ज असल्याचा दावा बीएमसीने हायकोर्टात केला आहे. मुंबईतील मॅनहोल्सना संरक्षक जाळी बसवण्यासंदर्भात व्यापारी संघटनेने केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान पालिकेने हा दावा केला.
कुलाबा ते सायन आणि चर्चगेट ते माहिम या भागात जिथे पावसाचं पाणी जमा होतं, त्या भागातील मॅनहोल्सवर लोखंडी संरक्षक जाळ्या बसवण्याचं काम पूर्ण झाल्याचंही बीएमसीने मुंबई उच्च न्यायालयात सांगितलं.
मुंबई शहर भागात 1425 ठिकाणी संरक्षक जाळ्या बसवल्या आहेत, असं बीएमसीचं म्हणणं आहे. पावसाचं पाणी तुंबू नये यासाठी बीएमसीकडे वॉटर पंप आणि सहा पम्पिंग स्टेशन्स सज्ज असल्याची माहितीही पालिकेने कोर्टात दिली.
दरम्यान, मुंबईच्या सहा समुद्रकिनाऱ्यांवर 36 जीवनरक्षक तैनात असल्याचंही पालिकेने कोर्टात सांगितलं. भरती दरम्यान साडेचार मीटर उंचीच्या लाटा उसळताना नागरिकांनी किनाऱ्याजवळ जाऊ नये, असं आवाहनही पालिकेनं केलं.
688 धोकादायक इमारतींना नोटीस जारी करण्यात आल्या आहेत, तर 299 ठिकाणी दरड कोसळ्याचा धोका असल्याच्या सूचना दिल्या आहेत, असंही पालिकेने सांगितलं.
डॉ. दीपक अमरापूरकर यांच्या मृत्यू प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपपत्र दाखल करण्यात आल्याची माहितीही पालिकेने दिली. गेल्या वर्षी उघड्या मॅनहोलमध्ये पडून अमरापूरकरांचा मृत्यू झाला होता.
या प्रकरणाची पुढील सुनावणी 18 जुलै रोजी होणार आहे.
पालिका प्रशासन मान्सूनसाठी सज्ज, बीएमसीचा हायकोर्टात दावा
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
21 Jun 2018 03:01 PM (IST)
मुंबईतील मॅनहोल्सना संरक्षक जाळी बसवण्यासंदर्भात व्यापारी संघटनेने केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान पालिकेने मान्सूनसाठी सज्ज असल्याचा दावा केला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -