मुंबई : मुंबईमध्ये गुरुवारी संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील पादचारी पुलाचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना झाली आहे. पालिका आणि रेल्वे प्रशासनाने पुलाची जबाबदारी घेण्याऐवजी दोन्ही प्रशासनांनी हात वर केले होते. पालिकेने म्हटले होते की, पूल रेल्वेचा आहे, तर रेल्वेने सांगितले होते की, पुलाची जबाबदारी पालिकेची आहे. या प्रकारामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. परंतु अखेरीस हा प्रश्न सुटला आहे. हा पूल पालिकेचाच असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी कबूल केले आहे.

सुरुवातीला पालिकेच्या स्थानिक नगरेसेविका सुजाता सानप म्हणाल्या होत्या की, "या पुलाची जबाबदारी रेल्वे प्रशासनाकडे होती". त्यावर रेल्वेने उत्तर दिले की, "हा पूल मुंबई महापालिकेच्या अखत्यारित आहे". मुंबई महापालिका आणि रेल्वे प्रशासन या घटनेची जबाबदारी एकमेकांवर ढकलत होते. तसेच मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर याबाबत म्हणाले की, "या पुलाची जबाबदारी रेल्वे प्रशासनाकडे होती." परंतु आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. कारण मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पुलाची जबाबदारी स्वीकारली आहे.

दरम्यान दोन वर्षांपूर्वीच स्थानिक नगरसेवकांनी या पुलाच्या दुरुस्तीबाबत निवेदन दिले होते. मात्र या पुलाचे ऑडिट झाले नाही, असे शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका सुजाता सानप यांनी म्हटले आहे. रेल्वे अधिकाऱ्यांना या पुलाच्या ऑडिट संदर्भात पत्र दिले होते, मात्र त्यांनी दुर्लक्ष केले. या दुर्घटनेला रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याचे नगरसेविका सानप यांनी सांगितले आहे.

यावर उत्तर देताना रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे की, हा पूल बृहन्मुंबई महापालिकेच्या अखत्यारित आहे. तरिदेखील आमचे प्रशासन पूर्णपणे सहकार्य करत आहे. रेल्वेचे डॉक्टर आणि अधिकारी घटनास्थळी असून जखमींची मदत करत आहेत. तसेच एक वर्षापूर्वी या पुलाचे ऑडीट करुन आम्ही या पुलाची डागडुजी केली होती.

पुलाबाबतची माहिती
हा पूल 1988 साली बांधण्यात आला.
2016 साली पुलाची किरकोळ दुरुस्ती आणि रंगरंगोटी करण्यात आली.
2017 मध्ये पुलाची पहाणी करण्यात आली. जे. डी. देसाई कन्सल्टंटने हा पूल धोकादायक नसल्याचा निर्वाळा दिला
डिसेंबर 2018 मध्ये पुलाच्या किरकोळ दुरुस्तीची निविदा काढण्यात आली, परंतु ही निविदा अद्याप स्थायी समितीमध्ये प्रलंबित आहे.
अखेर हा पूल पालिकेचा असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांना मान्य केले आहे.

VIDEO