मुंबई : पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात झालेल्या भीषण बस अपघातात 30 जणांचा मृत्यू झाला. या अपघातावरून शिवसेनेने 'सामना'च्या संपादकीयमधून सरकारवर टीका केली आहे. युद्ध न करता मरण पावलेले सैनिक आणि राज्यातील प्रत्येक अनैसर्गिक मृत्यूस राजाच कारणीभूत असतो, अशा शब्दात सरकारचा सामनाच्या अग्रलेखातून समाचार घेण्यात आला आहे.


बुलेट ट्रेनचे जपानी रूळ टाकले म्हणजे विकास नाही
"महाराष्ट्राचा प्रवास हा दर्‍याखोर्‍या आणि कडेकपारीतूनच आहे. समृद्धी महामार्गाचा हट्ट धरणार्‍यांनी हे लक्षात घेतले पाहिजे. बुलेट ट्रेनसाठी आग्यावेताळी तांडव करणार्‍यांनी महाराष्ट्राचा नागमोडी रस्ता समजून घेतला पाहिजे. बुलेट ट्रेनचे जपानी रूळ टाकले म्हणजे विकास नाही, तर दापोलीसारखे अपघात व सामुदायिक मृत्यू रोखण्यासाठी काम करणे हाच विकास आहे. महाराष्ट्राच्या रस्त्यांवर, दर्‍याखोर्‍यांत आणखी किती बळी जाणार आहेत?" असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे.


रेल्वे, रस्ते दुरुस्त करायचं सोडून सरकार बुलेट ट्रेन आणतंय
"सरकारचा राज्य करण्याचा धंदा चांगला आहे. समुद्रावर सहली जातात व तरुण पोरे बुडतात म्हणून समुद्रावर सहली घेऊन जायचे नाही, धबधब्यावर अपघात होतात म्हणून लोकांनी धबधब्यावर जायचे नाही. लोकांनी हे खायचे नाही आणि ते खायचे नाही. मग आता अपघात होतात म्हणून लोकांनी बसेस व गाड्यांत बसायचे नाही व प्रवास करायचा नाही असे फर्मान सुटणार आहे काय? लोकल ट्रेन्स भंगार झाल्या, सिग्नल यंत्रणा कोलमडली, रेल्वेचे रूळ नादुरुस्त आहेत. ते दुरुस्त करण्याचे सोडून सरकार बुलेट ट्रेन आणत आहे," अशा शब्दात सामनातून सरकारवर टीका करण्यात आली आहे.


राज्याचे मानसिक खच्चीकरण सुरू आहे
"दापोलीसारखे अपघात कधी टाळणार? निरपराध्यांचे जीव कसे वाचवणार? निवडणुका जिंकण्यासाठी ज्या जोरजबरदस्तीचा वापर होतो तेवढा जोर राज्याच्या कामकाजावर लावला तर हे असे शोकमय बळींचे राज्य निर्माण होणार नाही. हिंसाचार, जाळपोळ, आत्महत्या व अपघातांमुळे सध्या राज्याचे मानसिक खच्चीकरण सुरू आहे."


संबंधित बातम्या



पोलादपूर घाटात बस दरीत कोसळली, 30 जणांचा मृत्यू  


प्रकाश देसाई दरीतून वर आले, रेंज आल्यावर अपघाताची माहिती दिली!  


पोलादपूर बस दुर्घटना : बायकोने थांबवलं म्हणून जीव वाचला, प्रवीण रणदिवेंची पहिली प्रतिक्रिया 


पोलादपूर दुर्घटना: राष्ट्रपती, पंतप्रधान, राहुल गांधींनी व्यक्त केलं दु:ख