रायगड : रायगड जिल्ह्यातील उरण शहर परिसरात काल  'काळा' पाऊस बरसला. सुमारे अर्धा ते एक तासपर्यंत काळा पाऊस झाल्याने स्थानिकामध्ये भितीचं वातावरण होतं. पण काही जणांनी वाढत्या प्रदुषणामुळे अशा प्रकारचा पाऊस झाल्याचा दावा केला आहे.


शनिवारी सायंकाळच्या सुमारास उरण परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. सुमारे अर्धा ते एक तास झालेल्या पाऊस हा स्थानिकांना अचंबित करणारा होता. कारण, यावेळी झालेला पाऊस हा चक्क 'काळ्या' रंगाचा असल्याचे दिसून आला. यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये एकच भितीचं वातावरण होतं.

गेल्या दोन दिवसापासून परिसरात काळ्या रंगाचा पाऊस बरसत आहे. त्यामुळे उरण येथील रहिवासी मात्र काहीसे चिंतातुर झाले आहेत. तसेच याच नेमकं कारण शोधणं गरजेचे झालं आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात परतीच्या पावसाला सुरुवात झाली. त्यातच रायगड परतीच्या पावसासोबत विजांचा जोरदार गडगडाट सुरु आहे. शुक्रवारी दुपारी मुंबई आणि उरण दरम्यान झालेल्या जोरदार पावसावेळी बुचर बेटावरील तेलाच्या टाकीवर वीज कोसळली.

यानंतर या द्वीपावरील तेलाच्या टाकीला मोठी आग लागली. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुमारे तीन दिवसापासून  प्रयत्न सुरु होते. यामुळे, आकाशात मोठ्या प्रमाणात धुराचे लोण पसरले होते. या धुरामुळेच हा काळा पाऊस झाला असल्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे.