मुंबई : भाजपला मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीत मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयश आल्यानं पराभव झाल्याचं भाजपचे उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांनी एबीपी माझाच्या माझा कट्टा कार्यक्रमात म्हटलं.


विनय सहस्रबुद्धे मध्य प्रदेशचे प्रभारी म्हणून काम पाहत असल्याने प्रामुख्याने त्यांनी मध्य प्रदेशच्या पराभवाची कारणमिमांसा केली. तिकीट वाटप करताना जे समीकरण बनवावं लागतं ते समीकरण तयार करण्यात भाजप कुठेतरी कमी पडली. तसेच मोठा काळ सत्तेत असल्याने आमच्याकडून जनतेच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र त्या अपेक्षा पूर्ण करण्याची आमची धडपड कुठेतरी कमी पडली असल्याचं सहस्त्रबुद्धे म्हणाले.


मध्य प्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्थांपासून विधानसभेपर्यंत अनेक ठिकाणी भाजप सत्तेत असल्याने अनेक गोष्टींचं खापर भाजपवर फुटलं. कितीही तयारी केली तरी काही कमतरता राहतेच, असंही सहस्रबुद्धे म्हणाले.


मध्य प्रदेशात भाजप 15 वर्ष सत्तेत होती. त्यामुळे काही कारणांमुळे सत्ताधाऱ्यांविरोधात असंतोष मतदारांमध्ये निर्माण झाला असावा. नागरिकांना अनेकदा बदल हवा असतो आणि तो लोकशाहीतील त्यांचा अधिकार आहे. मात्र आम्ही जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. मात्र तरीही सत्तेच्या जवळ पोहोचूनही आम्ही सत्ता स्थापन करण्यात अयशस्वी ठरलो, याची खंतही सहस्रबुद्धे व्यक्त केली.


भाजपच्या हातून मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड खेचण्यात काँग्रेसला यश आलं आहे. लोकसभेची सेमीफायनल म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री वसुंधरा राजे, छत्तीसगडमध्ये रमण सिंह आणि मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान यांना जनतेनं नाकारलं आहे.