मुंबई : मुंबईतील 2012 मधील वानखेडे वादाप्रकरणी बॉलिवूड अभिनेता आणि कोलकाता नाईट रायडर्सचा मालक शाहरुख खानला दिलासा मिळाला आहे. वानखेडे स्टेडियमवरील धक्काबुक्की आणि शिवीगाळप्रकरणी शाहरुखला क्लीनचिट मिळाली आहे.
चौकशीत समोर आलं की, आयपीएल सामन्यादरम्यान शाहरुख ना नशेत होता, ना त्याने सुरक्षारक्षकाला शिवीगाळ केली, असं पोलिसांनी आपल्या अहवालात म्हटलं आहे. पोलिसांनी महानगर दंडाधिकारी न्यायालयात हा अहवाल सादर केला.
एका स्थानिक कार्यकर्त्याने शाहरुख खानविरोधात कोर्टात तक्रार दाखल केली होती. शाहरुखवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी या करण्यात आली होती.
2012 मध्ये वानखेडेवरील आयपीएल सामन्यानंतर सुरक्षारक्षक विकास दळवी, एमसीए अधिकाऱ्यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याचा आरोप शाहरुख खानवर होता. त्यानंतर एमसीएने शाहरुख खानवर वानखेडे स्टेडियममध्ये प्रवेश करण्यास 5 वर्षांची बंदी घातली होती. मात्र ही बंदी मागील वर्षी उठवण्यात आली.