मुंबई : शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रक्षोभक गोष्टींनंतरही भाजपा कार्यकर्ते शांत आहेत, याचा कुठलाही दुसरा अर्थ कोणी काढत असेल तर तो गैरसमज असून, जशास तसे उत्तर देण्यास भारतीय जनता पार्टी समर्थ आहे, असा इशारा भाजपचे प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांनी शिवसेनेला दिला आहे.


 

शिवसेनेने कार्यकर्त्यांना आवरावं, अन्यथा जशास तसे उत्तर देऊ

 

“पुतळे जाळणे, वृत्तपत्राची होळी करणे या गोष्टी भाजपाही करू शकते, परंतु सत्तेत एकत्र असल्याचे भान ठेवून आम्ही शांत आहोत. परंतु, आमच्या संयमाची परीक्षा कोणीही पाहू नये. शिवसेना नेत्यांनी जर त्यांच्या कार्यकर्त्यांना आवरले नाही तर जी स्वाभाविक प्रतिक्रिया भाजपा कार्यकर्त्यांकडून होईल.” असा इशाराच ठाकूर यांनी शिवसेनेला दिला आहे.

 

“सामना या मुखपत्रातून सातत्याने भाजपा नेते व सरकारवर विनाकारण व द्वेषमूलक टीका करण्यात येते. भाजपा सरकार हे निझामाच्या बापाचे सरकार असल्याची टीका प्रथम शिवसेनेच्याच नेत्याने जाहीरपणे केली. त्याला भाजपाच्या मनोगतमध्ये एकदा प्रत्युत्तर देण्यात आले. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाला”, असेही ठाकूर म्हणाले.

 

ठाकूर पुढे म्हणाले, “भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी जाहीरपणे कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा संदेश दिला. त्यानुसार भाजपा कार्यकर्ते शांत झाले. परंतु, यापुढे भाजपाचे राष्ट्रीय नेतृत्व व सर्वोच्च नेते यांच्याबद्दलची अवमान करणारी कोणतीही भाषा अथवा आंदोलन भाजपा खपवून घेणार नाही.”