ठाणे : ठाणे जिल्ह्यात भारतीय जनता पक्षातील गटबाजी उफाळून आली असून त्याचा परिपाक म्हणून भाजपा प्रदेश सचिव तथा माजी जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांनी भाजप पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यावर तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दयानंद चोरघे यांच्यावर भाजपा जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली होती.
दरम्यान त्यांची चार महिन्यांपूर्वी प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. परंतु जिल्ह्यातील खासदार कपिल पाटील व आमदार किसन कथोरे यांनी त्यांना निर्णय प्रक्रियेपासून बाजूला सारून काम सुरू केल्याने दयानंद चोरघे व त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याने त्यांनी भाजपा पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठवला आहे.
दयानंद चोरघे यांनी राजीनामा वैयक्तिक कारणास्तव देत असल्याचे नमूद केले आहे. तरी सुद्धा खासदार कपिल पाटील यांच्या कुरघोडीच्या राजकारणाला कंटाळून त्यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. येत्या काही दिवसात कार्यकर्त्यांशी चर्चा करून योग्य त्या पक्षात प्रवेश करण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे दयानंद चोरघे यांनी स्पष्ट केले आहे. दयानंद चोरघे यांच्या राजीनाम्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.