मुंबई : जिल्हा परिषदांमध्ये शिवसेनेसोबतच्य़ा युतीसंदर्भात भाजपची खलबतं सुरु झाली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक सुरु झाली आहे.
मुंबईत भाजपनं युतीसाठी हात पुढे केला नसला तरी जिल्हा परिषदांमध्ये युती करावी का? यासाठी भाजपची खलबतं सुरु आहेत.
जिल्ह्यात नंबर एकवर असूनही सत्तेपासून दूर राहिलेल्या सांगली, कोल्हापूर, जालना, औरंगाबाद, गडचिरोली, बुलडाणा,जळगावसारख्या जिल्हा परिषदांबाबत काय निर्णय घ्यायचा, शिवसेनेबरोबर युती करायची का, याबाबत आढावा घेतला जाणार आहे. तर यवतमाळ, नाशिक, हिंगोली सारख्या जिल्हा परिषदांमध्ये सत्ता स्थापनेसाठी सेनेला साथ द्यायची का, यावरही निर्णय या बैठकीतून अपेक्षित आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे, प्रदेश संघटनमंत्री रवींद्र भुसारी या बैठकीला उपस्थित आहेत.