भिवंडी : संपूर्ण भिवंडी शहरातील सामान्य नागरिकांना वीज चोरीच्या खोट्या केसेसमध्ये फसवून बदनामी करणाऱ्या टोरेंट पावर कंपनीवर जप्ती होण्याची नामुष्की ओढवली आहे. नुकतेच पालिकेच्या पथकाने टोरेंट पावर कंपनीचे अंजूर फाट्यावरील कार्यालय सील केला आहे. 176 कोटी 50 लाख थकबाकी भरली नसल्यामुळे भिवंडी महानगरपालिकेने कारवाई केली.


महापौर तुषार चौधरी यांच्या प्रयत्नाने आणि आयुक्त डाॅ. योगेश म्हसे यांच्या आदेशानुसार मनपाचे उप-आयुक्त दिपक कुरळेकर, करमुल्यांकन अधिकारी, सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे अधिकारी, कर्मचारी यांनी पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली

भिवंडीमध्ये वीज वितरण व वीज बिल वसूल करणाऱ्या टोरेंट पॉवर कंपनीने गेल्या दहा वर्षांपासून महानगरपालिकेला वापर भाडे कर न दिल्याने भिवंडी पालिकेने गेल्या पंधरा दिवसांपूर्वी टोरेंट कंपनीला 176 कोटी 50 लाख 92 हजार 616 रुपये कर भरण्याची नोटीस बजावली होती.

टोरेंट कंपनीने पालिकेच्या नोटिसी कडे दुर्लक्ष केल्याने उच्चन्यायालयाच्या निर्देशा नुसार येत्या दोन दिवसात टोरेंट कंपनीवर जप्तीची नोटीस लावून मालमत्ता लिलाव करणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे यांनी पत्रकांशी बोलताना सांगितले.

26 जानेवारी 2007 ला राज्य शासनाकडून भिवंडी शहराचा वीज वितरण व वीज बिल वसुलीचा ठेका टोरेंट कंपनीला शासनाने दिला आहे. या दहा वर्षाच्या कालावधीत या कंपनीने रस्त्यावरील एसटी ,एलटी पोल ट्रान्स्फार्मर ,जमिनीतून टाकण्यात आलेल्या केबल आदींचे भाडे भिवंडी महापालिकेला आजपर्यंत आदा केलेले नाही. त्यामुळे पालिकेचे प्रचंड नुकसान झाले आहे.

पालिकेने टोरेंट कंपनीला सन 2007 पासून या संदर्भात वारंवर नोटिसा बजावण्यात आले. तरी कंपनीने पालिकेचा कर भरलेला नाही. त्यामुळे आता भिवंडी पालिकेने टोरेंट कंपनीवर जप्तीची कारवाई करण्यात आली.