मुंबई: वादग्रस्त वक्तव्य करणारे आमदार राम कदम यांना कोणत्याही पक्षाने उमेदवारी देऊ नये. तसंच माता-बहिणींचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धाडसाने राम कदमांवर कारवाई करावी, असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केलं.


उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन भाजप आमदार राम कदम यांच्या वक्तव्याप्रकरणी जोरदार हल्ला चढवला.

‘मुलीने विरोध केला तरीही तिला पळवून आणून तुम्हाला देणार’ असं वक्तव्य भाजप आमदार राम कदम यांनी दहीहंडी कार्यक्रमात केलं. राम कदम यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर चहूबाजूंनी टीका होती.

उद्धव ठाकरे म्हणाले, "भाजप आमदाराने तारे तोडले आहेत. प्रशांत परिचारिक, श्रीपाद छिंदम असेल किंवा राम कदम असतील, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. एवढंच नाही तर यांना कोणत्याही पक्षाने उमेदवारी देऊ नये"

तसंच भाजपने 'बेटी भगाओ' अभियान सुरु केलं आहे का? असा प्रश्न विचारत मुख्यमंत्र्यांनी राम कदम यांच्यावर धाडसाने कारवाई करण्याचं आवाहनही उद्धव ठाकरेंनी केलं.

राम कदम पहिलेच नाहीत, भाजपच्या वाचाळवीरांची यादी मोठी

हार्दिक पटेलला पाठिंबा

गुजरातमध्ये पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलचं आरक्षणासाठी गेल्या 12 दिवसांपासून उपोषण सुरु आहे. उद्धव ठाकरेंनी फोन करुन या उपोषणाला आपला पाठिंबा असल्याचं सांगितलं. शिवाय तुझ्यासारख्या लढवय्यांची गरज आहे, त्यामुळे उपोषण मागे घेण्याची विनंती केली, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

दहीहंडीच्या कार्यक्रात राम कदम नेमकं काय म्हणाले होते?
"कोणत्याही कामासाठी भेटू शकता. साहेब, साहेब मी तिला प्रपोज केलं, ती मला नाही म्हणते, प्लीज मदत करा. शंभर टक्के मदत करणार. आधी मी सांगेन तुम्ही तुमच्या आई वडिलांना घेऊन या. जर आई-वडील म्हणाले की ही मुलगी मला पसंत आहे, तर तिला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार. त्या मुलीला पळवून आणण्यास मी मदत करेन. त्यासाठी माझा फोन नंबर घ्या आणि संपर्क साधा", असं राम कदम म्हणाले.

खेद व्यक्त, पण माफी नाहीच
"कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, दुखावल्या असतील, तर मी खेद व्यक्त करतो. अर्धवट 54 सेंकंदांचं विधान काही विरोधकांनी पसरवून संभ्रम निर्माण केला दुसऱ्या दिवशी! आदल्या दिवशी दुपारी मीडिया पत्रकार उपस्थित होते. त्यांनी आक्षेप घेतला नाही, कारण त्यांनी संपूर्ण संभाषण ऐकले होते", असं राम कदम यांनी ट्वीट केलं आहे.



संबंधित बातम्या

"मुली पळवण्याचा प्रकार घडला, तर पहिला गुन्हा राम कदमांवर दाखल व्हावा"

प्राची देसाईच्या डायलॉगसाठी राम कदमांनी गोविंदांना उतरवलं!

पूर्वी म्हणायचे 'टाक घोड्यावर आणि ने वाड्यावर', आव्हाडांचा राम कदमांवर हल्लाबोल 

राम कदम पहिलेच नाहीत, भाजपच्या वाचाळवीरांची यादी मोठी 

राम कदम माफी मागा नाहीतर, चपलेने हाणू : अॅड. स्वाती नखाते पाटील