मुख्यमंत्री बदलणार? भाजपकडून पहिली प्रतिक्रिया
एबीपी माझा वेब टीम | 25 Jul 2018 06:38 PM (IST)
मुख्यमंत्री बदलण्याचे काही कारणच नाही. गेल्या चार वर्षत मुख्यमंत्र्यांनी कुणाशीच दुजाभावाने वागले नाहीत, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.
मुंबई : भाजपमध्ये मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरु आहे, असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. त्यानंतर भाजपकडून तातडीने प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढे येत संजय राऊत यांच्या दाव्याचं खंडन केलं. मुख्यमंत्री बदलण्याचे काही कारणच नाही : चंद्रकांत पाटील मुख्यमंत्री बदलण्याचे काही कारणच नाही. गेल्या चार वर्षात मुख्यमंत्री कुणाशीच दुजाभावाने वागले नाहीत, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी माझी जेवढी तडफड आहे, त्यापेक्षा जास्त तडफड मुख्यमंत्र्यांची आहे, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. मुख्यमंत्री बदलाची चर्चा भाजपमध्ये नाही : सुधीर मुनगंटीवार मुख्यमंत्री बदलाची चर्चा भाजपमध्ये नाही, इथे सामूहिक निर्णय होतात, असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. तसेच, पथ का अंतिम लक्ष नही है सिंहासन, पर चढते जाना, सब समाजो के साथ लेकर आगे है बढते जाना, हा आमच्या पक्षाचा विचार आहे, असेही मुनगंटीवार म्हणाले. संजय राऊत यांनी काय दावा केला होता? भाजपमध्ये मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरु झाली आहे, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. "सध्या राज्यात परिस्थिती चिंताजनक आहे. मात्र या परिस्थितीला तोंड देण्यात राज्य सरकारला पूर्णपणे अपयश आलंय. त्यामुळे राज्यातील नेतृत्व बदलाचा निर्णय मोदी आणि अमित शाहांनी घ्यावा", असा सल्लाही संजय राऊत यांनी दिला. एवढंच नाही तर शरद पवारांच्या वक्तव्यात तथ्य असल्याची पुष्टीही राऊतांनी दिली. त्यामुळे राज्यात होणाऱ्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शिवसेना मुख्यमंत्र्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करत नाही ना असा प्रश्न पडला आहे.