अंबरनाथ : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना भाजपने स्वतःच्या फायद्यासाठी बाहेर काढल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. अंबरनाथमध्ये झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यानंतर एबीपी माझाशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
छगन भुजबळांवर असलेल्या आरोपांची चौकशी होईल, त्यात ते दोषी आढळले, तर त्यांना शिक्षाही होईलच. मात्र भुजबळांना जामीन मिळण्यासाठी जो उशीर झाला, त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला.
न्यायालयाने सांगितल्यानंतरही त्यांना दोन वर्षे जामीन मिळत नव्हता, ही बाब चुकीची असून, आता मात्र भाजपच्या फायद्यासाठी भुजबळांना बाहेर काढण्यात येत आहे. हे राजकारण चुकीचं असल्याची टीका राज ठाकरेंनी केली.
तसेच, भाजपलाही एक्सपायरी डेट आहेच, असा टोलाही त्यांनी लगावला.
भुजबळ सुटले!
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना जामीन मंजूर झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. तब्बल दोन वर्षांनी छगन भुजबळ बाहेर येणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाकडून भुजबळांचं वय लक्षात घेत जामीन मंजूर केला. भुजबळांना 5 लाखांचा जामीन मंजूर झाला. बोलावतील तेव्हा चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहणं, साक्षीदारांना प्रभावित न करणं, या अटींवर छगन भुजबळांना जामीन मंजूर झाला.
छगन भुजबळ यांनी 2 एप्रिल रोजी पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयाकडे जामीनासाठी अर्ज केला होता. या जामीन अर्जावर काल सुनावणी पूर्ण झाली. त्यानंतर आज मुंबई उच्च न्या्यालयाने त्यांना जामीन मंजूर झाला.