मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी इंजेक्शन दिल्यावर राहुल गांधी बोलतात. राहुल गांधी आमच्याकडे तीन वर्षांचा हिशेब मागतात. मात्र त्यांच्या चार पिढ्यांनी काय केलं, हे आधी सांगावं, असा हल्लाबोल भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी केला.


भाजप आरक्षण बंद होऊ देणार नाही, असं स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिली.

भारतीय जनता पक्षाच्या 38 व्या स्थापना दिनानिमित्त आज मुंबईत भव्य मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. वांद्रेतल्या बीकेसी इथं हा मेळावा पार पडला.

यात  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह कॅबिनेटमधले मंत्री आणि महाराष्ट्रभरातून आलेले कार्यकर्ते  उपस्थित होते.

महाराष्ट्रात सत्तेत आल्यानंतर भाजपनं या प्रकारचा पहिलाच मेळावा आयोजित केला.  आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली. त्या पार्श्वभूमीवर भाजपच्या या मेळाव्याकडे आगामी निवडणुकांची पूर्वतयारी म्हणूनच पाहिलं जात आहे.

अमित शाह यांचं भाषण

“राहुल बाबा आजकाल शरद पवारांसोबत बसतात. पावरांनी त्यांना इंजेक्शन दिलंय म्हणून हल्ली खूप उड्या मारत आहेत. राहुल बाबा विचारतात मोदीजी आपने साडे चार साल में क्या किया, पण देश विचारतोय राहुल बाबा चार पीढ्यांपासून तुम्ही काय केले?”, असं टीकास्त्र अमित शाहांनी केलं.

केंद्रात आणि राज्यात घोटाळ्याचा एकही आरोप देशभरात भाजपवर कोणी करू शकलं नाही. पूर आल्यावर सर्व लहान मोठे  झुडपं वाहून जातात. पण एकच वटवृक्ष उभं राहतो, त्यावर पाण्याच्या भीतीने सांप, मुंगूस, कुत्रे, मांजरं सगळेच आसरा घेतात; तसे मोदींच्या लाटेसमोर सर्वजण  एकवटले आहेत, असं म्हणत अमित शाहांनी विरोधकांवर टीका केली.

केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना घराघरात पोहचवा आणि 2019 च्या निवडणुकीत पुन्हा महाराष्ठ्रात आणि केंद्रात भाजपचं सरकार निवडून द्या, असं आवाहन अमित शाहांनी कार्यकर्त्यांना केलं.