मुंबई: शिवसेनेसोबतचा तणाव टोकाला गेला असताना, भाजपने खूपच जपून पावलं टाकणं पसंत केलं आहे. त्याचाच भाग म्हणून आता थेट भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.


उद्या म्हणजेच बुधवारी संध्याकाळी 7 वाजता ‘मातोश्री’वर ही भेट होणार आहे.

संपर्क अभियान अंतर्गत अमित शाह हे मुंबईत दौऱ्यावर येणार आहेत. त्यानुसार ते शिवसेनेशी चर्चा करणार आहेत.

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीनंतर, सत्तेतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना-भाजप युतीतील संघर्ष विकोपाला गेला आहे. त्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष राजकीय महत्व प्राप्त झालं आहे.

याआधी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी पाठिंबा मागण्यासाठी अमित शाह मातोश्रीवर गेले होते. त्यानंतर आता ते पुन्हा एकदा युतीच्या वाटाघाटीसाठी मातोश्रीवर जाणार आहेत.

शिवसेनेने यापूर्वीच स्वबळाची घोषणा केली आहे. पालघर पोटनिवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनीही त्याबाबतचा पुनरुच्चार करत, यापुढे कोणत्याही निवडणुकीत युती करणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला.

मात्र भाजपकडून सातत्याने शिवसेनेला चुचकारण्याचं काम सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: युतीसाठी हात पुढे केला आहे. तर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेशी युती करणं ही भाजपची अगतिकता असून, युती न झाल्यास काँग्रेस सत्तेत येईल, असा अंदाज महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वर्तवला.

या सर्व पार्श्वभूमीवर आता थेट अमित शाह यांना युतीसाठी मैदानात उतरवलं जात आहे. 2019 च्या निवडणुकांआधी युतीसाठी अमित शाहांनी पुढाकार घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

शिवसेना-भाजप यांच्यातील 25 वर्षापासूनची युती ही गेल्या निवडणुकीत म्हणजेच 2014 मध्ये तुटली होती. तेव्हापासून शिवसैनिकांमध्ये अमित शाहांबद्दल नाराजी आहे. तसंच शिवसेनेनेही ‘सामना’तून अनेकवेळा अमित शाहांवर टीकास्त्र सोडलं आहे.

संबंधित बातमी

 शिवसेनेच्या ताकदीने अनेकांना धडकी भरली : संजय राऊत