मुंबई : मोदी सरकारने नुकताच आपल्या मंत्रीमंडळाचा विस्तार केला आहे. यात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी तर काही नारळ दिला आहे. यात राज्यातील भाजप खासदार संजय धोत्रे यांनाही राजीनामा देण्यास सांगण्यात आले होते. केंद्रीय मंत्रिपद गेल्यानंतर संजय धोत्रे पहिल्यांदाच एबीपी माझाशी बोलले आहेत. यावेळी धोत्रे यांनी दोन वर्षातला मंत्रिपदाचा अनुभव, मंत्रीपद जाण्याची कारणं, या दोन वर्षांनी काय शिकवलं? पुढची राजकीय दिशा काय असणार या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. 


मंत्रिपद जाणं हा माझ्यासाठी धक्का नव्हता : संजय धोत्रे
माझ्याकडे तीन मंत्रालयाचा कारभार होता. आता त्या जागी पाच मंत्री केले आहेत. शिक्षण खात्यात नवीन शैक्षणिक धोरण, इलेक्ट्रॉनिक्स खात्यात बीएसएनएल रिव्हायवल पॅकेज, आयटी कम्युनिकेशनमध्ये माझ्या काळात दूरगामी निर्णय घेण्यात आले आहेत. मंत्रिपद जाणं हा माझ्यासाठी धक्का नव्हता. सहा महिन्यांपापूर्वी माझं मोठ ऑपरेशन झालं. त्यामुळे शारिरिक त्रास आणि कामाचा दबावही मोठा होता. मी पक्ष आणि पंतप्रधान मोदी यांच्याशी हे बोललो आणि  थोडा वेळ देण्याची विनंती केली होती. प्रकृती स्वास्थ्याकडे दुर्लक्ष झालं. त्याचे परिणाम मला भोगावे लागले. पंतप्रधानांशी माझं अनेकदा वन-टू-वन चर्चा झाली आहे. जे काही मतं मांडायचो, ते स्पष्टपणे मांडायचो, असे संजय धोत्रे म्हणाले.  


तुमच्या विचार प्रत्यक्षात येत नाही तोपर्यंत त्या विचाराला किंमत नसते : धोत्रे
एकदा आपण निर्णय करतो काही दिवसांसाठी लोक सुखावतात नंतर विसरतात. दिवसांमध्ये अनेक विचार मनात येत असतात. एका दिवसात जेवढे विचार मनात येतात तेवढे काम माणूस आयुष्यभर पण करू शकत नाही. आमच्या शास्त्रीय भाषेत म्हटलं जातं की कुठल्याही कन्सेप्टचं प्रोडक्ट झालं पाहिजे. तुमच्या विचारांची वास्तू किंवा वस्तू बनत नाही, तोपर्यंत त्या विचाराला किंमत नसते. 



नवे मंत्री झाले त्या सगळ्यांना शुभेच्छा : धोत्रे


मोदी सरकारमध्ये नव्याने मंत्री झालेल्या सर्वांना शुभेच्छा. आपले जे हितचिंतक असतात त्यांना आपण मोठे झालो की तेही मोठे झाल्यासारखे वाटतात. माझ्यावर लोकांनी खूप प्रेम केलं. निवडणुकीत आश्वासनं कधी दिली नाहीत. तरीही लोकांनी भरघोस मतांनी निवडून दिलं. मंत्रीपद काय कधी पक्षासाठी तिकीटही मागितलं नाही जे दिलं ते स्वतःहून दिलं पक्षानं. मी मंत्री झालो तेव्हाही अनेकांना आश्चर्य वाटलं. कारण मी कधी कुणाच्या मागे फिरत नाही. त्यामुळे कुठलीही गोष्ट मिळो ना मिळो मला त्याचा फरक पडला नाही. अनेक लोक सांगतात मी पोस्टर लावण्याचं काम करत होतो. मी तर त्याच्याही खाली काम केलेलं आहे. पोलिंग एजंट म्हणून सुद्धा राहिलो, असल्याचं धोत्रे यांनी आपल्या मुलाखतीत सांगितलं आहे.