BJP Morcha against Nawab Malik LIVE : देवेंद्र फडणवीस यांची सुटका, इतर नेत्यांचीही सुटका होणार
BJP Morcha against Nawab Malik LIVE : ठाकरे सरकारने नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा यासाठी भाजप आज मुंबईत विराट मोर्चा काढणार आहे. आझाद मैदान ते मेट्रो सिनेमा असा होणार आहे.
नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने मुंबईत आझाद मैदान ते मेट्रो सिनेमा असा मोर्चा काढला. यावेळी पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांना ताब्यात घेऊन त्यांना यलो गेट पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले होते. दरम्यान पोलिसांनी फडणवीस यांना सोडलं असून इतर नेत्यांनाही सुटका करण्यात येत आहे.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आझाद मैदान ते मेट्रो सिनेमा असा मोर्चा निघालेला असताना पोलिसांनी फडणवीस यांच्यासह चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, आशिष शेलार, प्रसाद लाड, किरीट सोमय्या, निलेश राणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
भाजपकडून जोरदार शक्तीप्रदर्शन
भाजपच्या प्रमुख नेत्यांना पोलीसांनी ताब्यात घेतलं
फडणवीसांना पोलीसांनी ताब्यात घेतलं
मेट्रो सिनेमा चौकात घोषणाबाजी
हा संघर्ष देशद्रोह्यांविरोधात आहे. दाऊदच्या गुर्ग्यांविरोधात संघर्ष आहे. भारतमातेसाठी ज्यांनी बलिदान दिलं त्यांच्यासाठी हा संघर्ष आहे. हे छत्रपतींचे मावळे आहेत, ते झुकणार नाहीत, वाकणार नाहीत, थकणार नाहीत, बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत व्यवहार करुन जेलमध्ये गेलेल्या नवाब मलिकांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. ही मागणी आमची केवळ राजकीय मागणी नाही. रोज घटना घडतात, पण रोज आम्ही राजीनामा मागत नाही. पण ही घटना बघितली तर लाजिरवाणी आहे. बॉम्बस्फोटातील आरोपी शहावली खान याकूब मेमनसोबत बसून बॉम्बस्फोटाचा कट केला, बॉम्बस्फोट कसा घडवायचा, स्कूटरमध्ये ठेवून बॉम्बस्फोट केले. दुसरा सलीम पटेल दाऊदची बहिण हसिना पारकर या दोघांनी मिळून हे कुंभाड रचलं. या हरामखोरांनी जमीन विकली, कोणाला विकली नवाब मलिकांना. मुंबईत उकिरड्याची जागाही 25 रुपये चौरस फुटाने मिळत नाही. या हरामखोरांसोबत व्यवहार करताना तुम्हाला लाज कशी वाटली नाही. जे मुंबईकर ज्यांचे बॉम्बस्फोटत चिंधड्या उडाल्या, ज्यांचे पती मेले, बाप मेले, घरदार उद्ध्वस्त झाले त्यांचे अश्रू दिसले नाहीत का? पैशासाठी इतके आंधळे झालात का? असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
नवाब मलिक यांच्यामागे सत्ता उभी केली. या सरकारपासून महाराष्ट्राला मुक्त करायचं आहे. बेईमान आघाडीला नेस्तनाबूत करायचं आहे. युतीच्या प्रेमापोटी नवाब मलिक यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. दहशतवादामध्ये ज्यांचा प्रत्यक्ष सहभाग आहे त्यांना जमिनीच्या माध्यमातून पैसे वाटले. ज्या देशाचा देशभक्त दहशतवादाला विसरतो तो कधीच सुरक्षित राहू शकत नाही. 1993 बॉम्बस्फोटात कोणी हात गमावला, कोणी पाय गमावला. यांना सत्ता प्रिय आहे. सत्तेसाठी विचार करणारी लोक आहेत. आमच्या पक्षाचं चिन्ह फ्लॉवर आहे पण आम्ही आता फ्लावर नाही फायर होणार. राजीनामा तुमच्या बापाला द्यावा लागेल. भाजपने तुमची दाणादाण केली आहे. या नेत्यांच्या तावडीतून महाराष्ट्राला वाचवायचं आहे, अशा शब्दात सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारवर निशाणा साधला.
"1993चा बॉम्बस्फोट अजूनही आम्ही विसरलो नाही. बॉम्बस्फोटात 84 लोक एकाच वेळी मारली गेली. दीडची वेळ आहे अशाच दीडची वेळ होती आणि स्टॉक एक्सचेंज जवळ स्फोट झाला. शिवसेना भवन, माहिम, सेंच्युरी बाजार, झवेरी बाजार, वांद्रे, प्लाजा, जुहू सेंटर, साहार एअरपोर्टवर बॉम्बस्फोट झाला. बॉम्बस्फोटाचा मास्टरमाइंड दाऊद होता. शेकडो लोक गेली. त्याचा एक बळी तुषार देशमुख देखील आज आला आहे. तो त्यावेळई सज्ञान देखील नव्हता. वरळी सेंचुरी बाजारजवळ टॅक्सीत स्फोट झाला आणि तुषारची आई जवळून खाक झाली. 45 नंबरच्या बसमधील लोकांचा कोळसा झाला होता. मुंबईसाठी शहीद तुषारची आई झाली आणि त्याने आपलं नाव तुषार प्रीती देशमुख असं लावायला सुरुवात केली. दुःख हे आहे की मेमन ज्याला फाशी झाली त्याचे पार्थिव ओळखू येईल असं होतं, मात्र आम्हाला पार्थिवाचं दर्शन घेता आलं नाही. मंत्रिमंडळात एक लुच्चा असा आहे तो म्हणाला मेमनला फाशी देऊ नका. त्याचं नाव काय आहे? अस्लम शेख. उद्धवजी तुम्ही त्याच्या मांडीला मांडी लावून बसता. या सर्व लोकांबरोबर मांडीला मांडी लावून बसता आणि म्हणता महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकणार नाही. साडे तीन जिल्हा म्हणजे महाराष्ट्र होत नाही. महाराष्ट्र कराचीसमोर झुकणार नाही हा आमचा प्रश्न आहे. झोपी गेलेल्या सरकारला जागं करायचंय. पवार आणि ठाकरेंना इशारा द्यायचा आहे. इंद्राय स्वा: तक्षाय स्वा: करायचंय," असं आशिष शेलार म्हणाले.
भाजपच्या मोर्चाला काही वेळातच सुरुवात होणार आहे. भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मोर्चासाठी आझाद मैदानात दाखल झाले आहे. भाजपचे प्रमुख नेते आझाद मैदानात पोहोचले आहे. देवेंद्र फडणवीस आझाद मैदानात पोहोचल्यावर मोर्चाला सुरुवात होईल.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस भाजपच्या मोर्चासाठी आझाद मैदानाकडे जाण्यासाठी रवाना झाले आहेत. या मोर्चाला भाजपचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी फडणवीस यांच्या नेतृत्त्वात मुंबईत भाजपचा मोर्चा होणार आहे. आझाद मैदान ते मेट्रो सिनेमा असा हा मोर्चा असेल.
मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर हा मोर्चा आता आझाद मैदान ते मेट्रो सिनेमा असा होणार आहे. या मोर्चासाठी आझाद मैदानात एक मोठे व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. याचबरोबर शेकडो खुर्च्या आणि बॅनर्स या ठिकाणी लावण्यात आले आहेत.
या आंदोलनासाठी नाशिकहून शेकडो भाजप कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहेत. ठाकरे सरकारविरोधात घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांचा तांडा मुंबईकडे निघाला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केलेल्या गौप्यस्फोटाने कार्यकर्त्यांना स्फुरण चढले आहे. दरम्यान राज्यभरातून भाजप कार्यकर्ते मुंबईत दाखल होणार असल्याचं कळतं.
पार्श्वभूमी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजप आक्रमक झाली आहे. ठाकरे सरकारने नवाब मलिक यांचा राजीनामा त्वरित घ्यावा, या मागणीसाठी मुंबई आज विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. आधी भायखळा इथून आझाद मैदानाकडे निघणार होता. मात्र याला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर हा मोर्चा आता आझाद मैदान ते मेट्रो सिनेमा असा होणार आहे. या मोर्चासाठी आझाद मैदानात एक मोठे व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. याचबरोबर शेकडो खुर्च्या आणि बॅनर्स या ठिकाणी लावण्यात आले आहेत. फक्त आझाद मैदान नाही तर संपूर्ण मुंबईभर असे शेकडो बॅनर्स भाजपने लावले आहेत. साडे दहा वाजताच्या दरम्यान या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात होणार आहे.
हा ठाकरे सरकारचा निर्लज्जपणा : आशिष शेलार
नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्यात येत नाही हा ठाकरे सरकारचा निर्लज्जपणा आहे, नवाब मलिक अटक प्रकरणी कोर्टाने सुद्धा यावर गंभीर स्वरुपाच्या नोंदी केल्या आहेत. याचा अर्थ न्यायलय सुद्धा सक्षमपणे काम करत आहे. केवळ लाचारी आणि मतांसाठी मलिकांचा राजीनामा घेत नाही असा आरोप शेलार यांनी ठाकरे सरकारवर केला आहे. जोपर्यंत राजीनामा घेणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहिल असे आशिष शेलार म्हणाले. नवाब मलिकांवरची कारवाई सुडबुद्धीने नसून बोलणाऱ्यांची सडकी बुद्धी आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
मंत्री नवाब मलिक यांच्यावर झालेले आरोपांनंतर भाजप आक्रमक झाली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधक नवाब मलिकांच्या राजीनाम्यावरुन आक्रमक झालेले पाहायला मिळाले. परंतु नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नाही अशी ठाम भूमिका सत्ताधारी पक्षाने घेतली आहे.
नवाब मलिक यांना 21 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी
दरम्यान राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना 21 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. नवाब मलिक यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. त्यांना 21 मार्चपर्यंत कारागृहात ठेवण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाने दिले आहेत. मनी लाँड्रिंग प्रकरणी नवाब मलिक यांची रिमांडमधील चौकशी पूर्ण झाल्याची माहिती ईडीने PMLA कोर्टात दिली. 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळताच नवाब मलिकांची रवानगी आता आर्थर रोड कारागृहात होणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -