मुंबई: 'एसीमध्ये बसून बोलायला काय जातं, गुन्हे तर कार्यकर्त्यांवर दाखल होतात. कधीतरी बाहेर पडून  रस्त्यावर या आणि शेवटच्या थरावर चढून दाखवा.' अशा शब्दात भाजप आमदार राम कदम यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर थेट टीका केली.

 

'हे एसीमध्ये बसून आदेश देणार, कार्यकर्त्यांना चिथावणार... गुन्हे कोणावर दाखल होणार तर बिचाऱ्या रस्त्यावरच्या कार्यकर्त्यांवर, तुरुंगात कोण जाणार तर हेच कार्यकर्ते. त्यावेळी त्यांच्या मदतीला त्यांच्या आई वडिलांशिवाय दुसरं कोणीही जात नाही. माझ्या स्वत:वर सतरा गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे फक्त असं आदेश देणं योग्य नाही.' असं म्हणत राम कदम यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला.

 

दरम्यान, सर्वात मोठी दहीहंडी असं बिरुद मिरवणाऱ्या राम कदम यांच्या घाटकोपर येथील दहीहंडीला केवळ 5 टक्के प्रतिसाद मिळाला. राम कदम यांनीही हे मान्य केलं . तसेच खासदार किरीट सोमय्या यांच्यासोबत त्यांनी दहीहंडी फोडण्याचा आनंद घेतला.

 

संबंधित बातम्या:

स्टूलवर उभं राहून हंडी फोडू का? कोर्टाने नको तिथं नाक खुपसू नये : राज ठाकरे