मुंबईरोहित पवार (Rohit Pawar) हे पहिल्या टर्मचे आमदार आहेत. त्यांना अजून आमदारकीच्या मिश्या सुद्धा फुटल्या नाहीत, अशी बोचरी टीका भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केली आहे. अमेरिकेत कुठला मुलगा जन्माला आला की रोहित पवार म्हणतील हा माझाच मुलगा आहे.  स्वतःला जगतगुरु कोणी समजू नये असा हल्लाबोल नितेश राणे यांनी केला. 


कंत्राटी नोकर भरतीवरून सध्या राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. तलाठी, तहसीलदार पदांची भरती कंत्राटी तत्वांवर करण्याचा आदेश शिंदे-फडणवीस-पवार सरकारने काढला होता. सरकारच्या आदेशावर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. राज्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे युवक, तरुणांमध्ये मोठे नाराजीचे वातावरण होते. विरोधकांनीदेखील या मुद्यावर सरकारवर टीका केली होती. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी भरतीचा शासन आदेश मागे घेत असल्याचे जाहीर केले. सरकारने या घेतलेल्या या निर्णयावरून वाद रंगला आहे. फडणवीस यांनी कंत्राटी भरतीचा जीआर महाविकास आघाडी सरकारच्या काळातील असल्याचे सांगितले होते. त्यानंतर शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे भाजपवर टीका केली. 


राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीदेखील फडणवीसांवर टीका केली. त्याला भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले. राणे यांनी म्हटले की, रोहित पवार हे पहिल्या टर्मचे आमदार आहेत. अजून त्यांना आमदारकीच्या मिश्या सुद्धा फुटल्या नाहीत. कंत्राटी भरतीचा शासन आदेश हा महाविकास आघाडीचे पाप आहे. उद्धव ठाकरेंचं पाप आहे याचा बुरखा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फाडला. रोहित पवारांच्या आजोबांनी मार्गदर्शन करून जीआर काढला होता, अशी टीका त्यांनी केली. 


मातोश्री आणि सिल्वर ओकवर यात्रा काढावी


रोहित पवार हे युवा संघर्ष  यात्रा काढणार आहेत. या यात्रेत शासकीय नोकऱ्यांमधील कंत्राटी भरती, स्पर्धा परीक्षांचे शुल्क, नोकर भरतीसह विविध मुद्दे आहेत. नितेश राणे यांनी युवा संघर्ष यात्रेवरूनही रोहित पवारांवर निशाणा साधाला. रोहित पवारांनी युवा संघर्ष  यात्रा ही मातोश्री आणि सिल्वर ओक भोवती काढावी असा टोला नितेश राणेंनी लगावला. रोहित पवार हे पहिल्या टर्मचे आमदार आहेत. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना सल्ला देऊ नये. त्यांनी अक्कलेचे तारे तोडू नये असे सांगताना कंत्राटी भरतीचा शासन आदेश कोणी काढला याची माहिती त्यांनी गजनीसारखी रोहित पवारांनी स्वत:च्या शरीरावर लिहून घ्यावे आणि आठवत नसेल तर पहावे असा खोचक सल्लाही राणे यांनी दिला. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: