Rohit Pawar : "कंत्राटी भरतीच्या मुद्दावरुन सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्योरोप सुरु आहे. या वादात आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी उडी घेतली आहे.  कंत्राटी भरतीचा जीआर हा 1998 मध्ये काढण्यात आला. त्यावेळी भाजपचं सरकार होतं. खोटं बोलणं थांबवा आणि माफी मागा", असा पलटवार रोहित पवारांनी केला आहे. तुमच्या आधीच्या नेत्यांनी जे केलं त्याची जबाबदारी तुम्ही घेणार का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. भाजपच्या नेत्यांनी हे सगळे जीआर वाचावे, असंही ते म्हणाले.


काय म्हणाले रोहित पवार?


कंत्राटी भरतीचा जीआर हा 1998 मध्ये काढण्यात आला होता. त्यावेळी भाजपचं सरकार होतं. भाजपच्या पूर्वीच्या नेत्यांनी हा जीआर काढला त्यामुळे पक्ष म्हणून त्या नेत्यांची जबाबदारी तुम्ही घेणार का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. या कंत्राटी संदर्भात भाजप आता कॉंग्रेसवर खापर फोडत आहे. ज्या भाजपच्या नेत्यांनी महाविकास आघाडीच्या मोठ्या नेत्यांना माफी मागण्याची मागणी केली. त्या सगळ्या भाजपच्या नेत्यांनी आतापर्यंतचे सगळे जीआर वाचावे आणि सगळ्या नेत्यांनी जनतेची माफी मागावी, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे. 


अडीच लाख पदांसाठी जाहिरात काढा...


राज्यातील कोणत्याही विषयावर आता कोणत्याही पक्षाने खोटं बोलण्याची गरज नाही आता सगळ्यांनीच मुद्द्यावर बोलण्याची जर आहे, असं युवा म्हणून  कायम वाटतं. आता हा कंत्राटी भरतीचा निर्णय मागे घेतला आहे. मात्र या सगळ्या हालचालींवर आमची नजर असणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. शासनाच्या विविध विभागात जी पदं रिक्त आहे. त्या अडीच लाख पदांसाठी पुढच्या काही दिवसात जाहिरात काढा आणि पुढच्या काही महिन्यात याची भरती प्रक्रिया संपवावी, अशी मागणीदेखील त्यांनी सरकारला केली आहे. 


ललित पाटील प्रकरणात डीनचा हात?


सध्या राज्यात ड्रग्जचा विखळा आहे. ललित पाटील प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहे. ससून रुग्णालयात बसून ललित पाटील ड्रग्ज रॅकेट चालवत होता. हे ससूनचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांना माहिती नव्हतं असं नाही . त्यांचाही हात या ललित पाटील प्रकरणात आहे आणि काही नेत्यांचाही याला पाठिंबा आहे, असाही आरोप रोहित पवारांनी केला आहे. 


महत्वाची बातमी-


lalit Patil Drug Racket : ललित पाटीलचा साथीदार रेहान शेख पुणे पोलिसांच्या ताब्यात; कारखान्यासाठी मदत अन् ड्रग्ज विक्रीची करायचा डील