मुंबई : मीरा भाईंदरचे भाजप आमदार नरेंद्र मेहता यांची लँबॉर्गिनी कार गेल्या वर्षभरापासून चर्चेत आहे. गुरुवारी तर ही कार चक्क विधानभवनात घिरट्या घालताना दिसली.
स्टायलिश... फास्ट अँड फ्यूरियस... सुपरकार लँबॉर्गिनी... पण एरवी चित्रपटांमध्ये दिसणारी ही गाडी चक्क विधानभवनाच्या आवारामध्ये घिरट्या घालत होती. काही काळ विधानभवनाच्या दारात गाडी थांबली आणि पुन्हा वाऱ्याच्या वेगाने निघून गेली.
चौकशी केली तेव्हा ही भगवी परी भाजपचे आमदार नरेंद्र मेहतांची असल्याचं समोर आलं. नरेंद्र मेहता हे मीरा भाईंदरचे आमदार आहेत. निवडणूक जाहीरनाम्यात त्यांची संपत्ती ही 18 कोटींच्या घरात आहे.
नरेंद्र मेहता हे सेव्हन इलेव्हन ग्रुप ऑफ कंपनीचे मालक आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या पत्नीच्या वाढदिवसाला ही आलिशान लॅम्बॉर्गिनी गिफ्ट दिली होती. पहिल्याच दिवशी त्यांच्या पत्नीने याच गाडीने रिक्षाला धडक दिली होती. त्यामुळे याच कारमुळे नरेंद्र
मेहता चर्चेत आले होते.
लॅम्बॉर्गिनीमध्ये भारतात दोन प्रकार मिळतात, हरकेन आणि अॅव्हेन्टेडोर. नरेंद्र मेहतांकडे हरकेन ही कार आहे. तिची किंमत 5 कोटी ते साडेपाच कोटींच्या घरात आहे. 3 सेकंदात ही कार 100 किमी प्रतितास इतका वेग गाठू शकते. ही कार तब्बल 350 किलोमीटर प्रतितास इतक्या वेगाने धावू शकते.
मोठमोठे सेलिब्रिटीज ही कार पसंत करतात. विशेषतः हॉलिवुडचे स्टार्स. पण ज्या विधानसभेकडे काही हजारांच्या कर्जमाफीसाठी शेतकऱ्याने आस लावली आहे. त्याच विधानसभेतले आपले प्रतिनिधी 5-5 कोटींच्या कार फिरवणं योग्य आहे का?