मुंबई : कोरोना व्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विनंतीला मान देत मुंबईतील सर्व प्रमुख गणेशोत्सव मंडळांनी यंदाच्या उत्सवाला छोटं स्वरूप दिलं आहे. मात्र लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने यंदाचा उत्सव रद्द केल्याचं काल जाहीर केलं. लालबागचा राजाची 87 वर्षांची परंपरा आहे, ती खंडित न करण्याची मागणी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. कोरोनासंबंधी शासनाचे सर्व नियम पाळून उत्सव साजरा करण्याचं आवाहन करत गणेशभक्तांची आणि लालबागच्या राजाची ताटातूट का करताय? असा प्रश्न त्यांनी सरकारला विचारला आहे.
आशिष शेलार ट्वीटमध्ये म्हटलं की, सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी शताब्दी वर्षात पारंपरिक गणेशोत्सव अडचणीत आलाय. पण बाप्पा मार्ग काढेल. मुंबईत छोट्या मंडळांसह गणेश गल्ली, चिंतामणी यांनी मूर्तीची उंची कमी करुन, सामाजिक उपक्रमांसह उत्सवाची परंपरा टिकवणार.. त्यांचे कौतुकच!
लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने सामाजिक उपक्रम राबवण्याचा घेतलेला निर्णय 'स्तुत्यच'. पण मंडळाची 87 वर्षांची परंपरा एकाकी खंडित होऊ नये. गणेशभक्तांची श्रद्धा पाहता शासनाच्या सूचना पाळून उत्सव साजरा होऊ शकतो, याचा आदर्श निर्माण करण्याची 'हीच ती वेळ'.
संकट मोठे आहे, अशावेळी सामान्य माणसाला श्रद्धाच आशादायी ठरते. संकट काळात राजाचे ऑनलाईन दर्शन सुद्धा गणेशभक्तांना दिलासा देऊ शकते. या देशात श्रध्देला मोल नाही. श्रद्धा तोलून ही पाहता येत नाही. म्हणून गणेशभक्तांची आणि राजाची ताटातूट का करावी? असं आशिष शेलार यांनी म्हटलं.
लालबाग गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी यंदाचा गणेशोत्सव रद्द करत असल्याचं सांगितलं. त्यांच्या निर्णयाला हजारो भक्तांनी पाठिंबा दर्शवला. यंदा उत्सव रद्द करून कोरोना आरोग्योत्सव आयोजित करत असल्याचं साळवी यांनी सांगितलं. यावेळी सांगताना सुधीर साळवींनी आरोग्योत्सव साजरा करणार म्हणजे काय करणार तर...
- गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार नाही. मात्र, भविष्यात तीच मूर्ती कायम राहणार.
- अकरा दिवस फक्त रक्तदान आणि प्लाझ्मा थेरपीसारखे आरोग्यसेशी संबंधित उपक्रम राबवणार.
- कोरोना लढ्यात शहीद झालेल्या पोलिसांच्या कुटुंबातील 20 वीरमातांचा सन्मान करणार.
- गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या जवानांच्या वीरमाता, वीरपत्नींचा सन्मान करणार.
- मुख्यमंत्री सहायता निधीत 25 लाख रुपये जमा करणार.
Ganeshotsav 2020 | शासनाचे नियम पाळून उत्सव साजरा करा; आशिष शेलार यांचं लालबागचा राजा मंडळाला आवाहन