मुंबई : मुंबई महापालिकेच्या अभियंत्याला शिवीगाळ केल्याच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाची चौकशी करा, अशी मागणी करणारं पत्र भाजप आमदार अमित साटम यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना लिहिलं आहे.


विधानसभेत एसआरए इमारतींचा 50 हजार कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आणल्याने महापालिका आणि एसआरएचे 36 अधिकारी अडचणीत येणार आहेत. त्यामुळे मला बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचल्याचा आरोपही अमित साटम यांनी केला आहे. तसंच भविष्यात या लोकांकडून धोका असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.



काय आहे प्रकरण?
महापालिकेच्या एका अभियंत्याला अर्वाच्य शिवीगाळ केल्याचा आरोप अमित साटम यांच्यावर होत आहे. पैसे उकळण्यासाठी साटम यांनी धमकी दिल्याचा दावा अभियंत्यांनी केला आहे. अर्वाच्य शिवीगाळ करणारी ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे.

अमित साटम यांनी के-पश्चिम वॉर्डमधील राठोड (कनिष्ठ अभियंता) आणि पवार (सहाय्यक अभियंता) यांना शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.

अमित साटम हे भाजपकडून मुंबईतील अंधेरी पश्चिम भागातील आमदार आहेत.

भाजप आमदार अमित साटम यांची अभियंत्याला शिवीगाळ?

अमित साटमांनी आरोप फेटाळला
फोन संभाषणातील सुरुवातीचा आवाज आपला असला, तरी शिवीगाळ ऐकू येत असलेला संभाषणाचा भाग एडिट किंवा मॉर्फ करुन व्हायरल केल्याचा दावा अमित साटम यांनी केला आहे.

पवार यांनी के-वेस्ट वॉर्ड सोडून दहा महिने झाले, म्हणजे हे संभाषण किमान एक वर्ष जुनं असावं. असं कोणतंही संभाषण झाल्याचं आपल्या आठवणीत नाही, असा दावाही साटम यांनी केला.

अभियंते पवार यांच्याशी आपले चांगले संबंध होते, त्यामुळे त्यांना शिवीगाळ करण्याचा प्रश्नच येत नाही. आपण विधानसभेत 50 हजार कोटींचा बिल्डिंग स्कॅम बाहेर काढला होता. त्याबाबत चौकशी सुरु असून लोकायुक्तांकडे सुनावणी सुरु आहे. त्यामुळे निर्णय होण्याआधी माझी बदनामी करुन दबाव आणण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे, असं साटम म्हणाले.