मुंबई : सत्तेच्या शिकारीसाठी सर्व लांडगे एकत्र येत आहेत, पण भाजप ही सिंहाची पार्टी असल्याचा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्या आघाडीची चाचपणी करणाऱ्या विरोधकांना लगावला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या 38 व्या स्थापना दिनानिमित्त आज मुंबईत भव्य मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. वांद्रे-कुर्ला संकुलात हा मेळावा पार पडला. यात  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह कॅबिनेटमधले मंत्री आणि महाराष्ट्रभरातून आलेले कार्यकर्ते  उपस्थित होते.

भाषणाच्या सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं. तसंच त्यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही आपल्या भाषणातून चिमटा काढला.

"ज्यांची दुकानदारी मोदींनी बंद केली, असे सगळे बेरोजगार एकत्रित येऊन मोदींविरोधात लढण्याचा विचार करत आहेत. शिकार दिसली की लांडगे कसे एकत्रित येतात, तसेच सगळे लांडगे आता सत्तेच्या शिकारीसाठी एकत्र येत आहेत. पण काळजी करु नका, भाजप ही सिंहाची पार्टी आहे. याआधी कितीही लांडगे आले ते सिंहाशी लढू शकणार नाहीत. मोदींसारखा सिंह आज आमच्याजवळ आहे.

आरक्षण कोणीही हिरावणार नाही
सत्तेसाठी एकत्र आलेले लांडगे भविष्यात दंगली घडवतील. सत्तेकरता बुद्धीभेद करतील. माणसा-माणसात लढाई लावतील. समाजात तेढ निर्माण करतील. पण भाजपची सामाजिक न्यायाची भूमिका पक्की आहे. आमचं म्हणणं स्पष्ट आहे, संविधानात बाबासाहेब आंबेडकरांनी एससी, एसटी आणि ओबीसींचं आरक्षण कोणीच हिरावणार नाही. ते आरक्षण ही भाजपची भूमिका आहे.  पण काहीही झालं तरी या लांडग्यांना सत्तेत येऊ देणार नाही," असं मुख्यमंत्री म्हणाले.

'..तर औषधालाही उरणार नाही'
विरोधक म्हणतात मुख्यमंत्र्यांनी इतक्या लोकांना चहा पाजला, पवारसाहेब म्हणाले आमच्या काळात एवढे लोक चहा पीत नव्हते. पवारसाहेब
आम्ही जे पितो तेच लोकांना पाजतो, तुमच्या पक्षातले लोक जे पितात ते आम्हाला पाजता येत नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या, चहावाल्याच्या नादाला लागू नका. 2014 साली ज्या चहावाल्याच्या नादी लागलात, तुमची धूळधाण झाली. पुन्हा चहावाल्याच्या नादी लागलात तर औषधालाही उरणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.

मंत्रालयातील उंदीर घोटाळ्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, साडे चार लाख कोटींचा भ्रष्टाचार करणारे नालायक आमच्यावर साडे चार लाख उंदरांना मारण्यात पैसे खाल्याचा आरोप करत आहेत.

पवारांच्या इंजेक्शनमुळे राहुल गांधी बोलतात: अमित शाह

मी भरलेल्या वर्गाचा मॉनिटर
आज काय परिस्थिती आहे. कोणी बोलतो मी वर्गाचा मॉनिटर आहे. खरंय मी वर्गाचा मॉनिटर आहे. पण माझा वर्ग आमदारांनी भरलेला आहे, फुललेला आहे. मी भरलेल्या वर्गाचा मॉनिटर आहे. तुमच्यासारखा रिकाम्या वर्गाचा मॉनिटर नाही. आधे इधर जाओ, आधे उधर जाओ और बाकी मेरे पीछे आओ, असा टोला मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना लगावला.

हल्लाबोल नाही, डल्लामार यात्रा
इतकी वर्ष शेतकऱ्यांच्या नावाने पैसा खाल्ला. तो पैसा शेतकऱ्यांना मिळाला नाही. तो ज्यांच्या तिजोरीत गेला, तेच आता हल्लाबोल करत आहेत. हल्लाबोल नाही तुमची डल्लामार यात्रा आहे. तुम्ही तर महाराष्ट्रच्या तिजोरीवर डल्ला मारला आहे. महाराष्ट्राची जनता खुळी नाही. ही जनता तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.

पवारांच्या इंजेक्शनमुळे राहुल गांधी बोलतात: अमित शाह
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी इंजेक्शन दिल्यावर राहुल गांधी बोलतात. राहुल गांधी आमच्याकडे तीन वर्षांचा हिशेब मागतात. मात्र त्यांच्या चार पिढ्यांनी काय केलं, हे आधी सांगावं, असा हल्लाबोल भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी केला.

भाजप आरक्षण बंद होऊ देणार नाही, असं स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिली.

मुख्यमंत्र्याचं संपूर्ण भाषण