Kirit Somaiya On ED Raids : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मालमत्तेवर ईडीने टाच आणल्यानंतर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना शिवसेनेवर निशाणा साधला आहे. संजय राऊत आणि त्यांच्या पत्नी गैरव्यवहार समोर आले आहे. मागील काही महिन्यांपासून ईडीच्या कारवाईतून वाचण्यासाठी संजय राऊत यांची धडपड सुरू होती. मात्र, आता या प्रकरणात आणखी कारवाई होणार असल्याचेही सोमय्या यांनी म्हटले. पत्राचाळ घोटाळा प्रकरणातील पैसे प्रवीण राऊत, संजय राऊत आणि वर्षा राऊत यांनी वापरले असल्याचाही आरोप सोमय्या यांनी केला. या कारवाईसाठी किरीट सोमय्या यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, ईडी अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. 


किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, संजय राऊत यांनी पीएनबी घोटाळा प्रकरणात ईडीकडे 10 महिन्यांआधी 55 लाख रुपये जमा केले होते. संजय राऊत यांची ही कृती म्हणजे घोटाळ्यात सहभाग असल्याची कृती असल्याचे सोमय्या यांनी म्हटले. ईडीच्या कारवाईची कल्पना संजय राऊत यांना होती. त्यामुळे त्यांनी किरीट सोमय्या, नील सोमय्यांना अटक करण्याची मागणी केली होती. त्यांची ही धडपड, मानसिकता समजू शकतो असेही त्यांनी म्हटले. 


शिवसेनेवर साधला निशाणा


आपल्यावर ईडीची कारवाई होणार असल्याचा अंदाज संजय राऊत यांना आला होता. त्यामुळेच काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यात बैठक झाली असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. ईडी अधिकाऱ्यांचे तोंड बंद करता येईल असे महाराष्ट्र सरकारला वाटत होते. मात्र, आता आणखी कारवाई होणार असल्याचे सोमय्यांनी म्हटले. पोलिसांचा माफिया म्हणून वापर करून कारवाई टाळता येणार नसल्याचे त्यांनी म्हटले. आपल्या माफिया सरदारांना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांची धडपड सुरू असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला.


गृहमंत्री वळसे-पाटील यांच्यावर निशाणा


ईडी अधिकाऱ्यांवर संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांवर राज्य सरकारने एसआयटी स्थापन केली आहे. या मुद्यावरून सोमय्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर टीका केली. संजय राऊत यांच्या प्रकरणाची माहिती त्यांनी घ्यावी आणि कारवाई अशी मागणीदेखील सोमय्यांनी केली.