मुंबई : काही नात्यांमध्ये लिहून घेतलं जात नाही. शिवसेना आणि भाजपनं कधी एकमेकांकडून कधी काही लिहून घेतलं नाही. शिवसेना आणि भाजपचं नातं तुटलेलं नाही. दोन भावांमध्ये देखील भांडणं होतात. दोन भाऊ व्यावहारिक कारणामुळे वेगळे झाले झाले आहेत. म्हणून त्यांच्यातलं नातं कधी तुटत नाही, अशी सूचक प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. ते एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझा व्हिजन या कार्यक्रमात बोलत होते.
या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी सोबत सहभाग घेतला आणि आपलं व्हिजन सांगितलं. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, प्रत्येक माणसाला त्याच्या पायावर उभा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मोदीजींच्या केंद्राच्या विकासाचा धागा धरून आम्ही काम केलं. यात सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेऊन काम केलं. शेतकऱ्यांसाठी पाणी उपलब्ध झालं. त्यामुळे त्याच उत्पादन वाढलं, त्यांना हमीभाव मिळाला. सिंचनाचे प्रकल्प आम्ही पूर्ण केलं, असं पाटील म्हणाले.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, जमिनीतील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. राज्यातील मार्केट कमिट्या सदृढ करण्याचा आम्ही प्रयत्न केला. आम्ही मार्केट कमिट्यामध्ये माल विकण्याचं बंधन काढलं. शेतकऱ्यांची स्थिती अशी स्थिती निर्माण करायची की तो स्वतः सक्षम झाला पाहिजे, असं आमचं व्हिजन होतं, असंही ते म्हणाले.
ते म्हणाले की, अपुऱ्या पैशांवर बनलेले रस्ते खराब होतात. राज्यात आधी 200 मीटरला टेंडर असायचं ते बंद करून दहा किलोमीटरला एक टेंडर केलं. आणि दोन वर्षात रस्ता खराब झाला तर तो त्याच कॉन्ट्रॅक्टरने केला पाहिजे, असा नियम केला. आम्ही महाराष्ट्र खड्डेमुक्त करण्याचा प्रयत्न केला. अनेक रस्त्यांची कामं पूर्ण होत आली आहेत, आता त्याचं उदघाटन चव्हाण साहेबांना करण्याचा आनंद मिळणार आहे, असा टोला देखील त्यांनी लगावला.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, महसूलमध्ये देखील आम्ही खूप काम केलं. सातबारा ऑनलाईन केला. अडीच कोटी सातबाऱ्याचं डिजिटलायझेशन केलं. आता तलाठ्याकडे सातबारा घेण्यासाठी जायची गरज नाही. सरकाकरी अधिकाऱ्यांकडे चकरा मारणे बंद केलं. रोजगार हमी योजनेमध्ये देखील आम्ही काम केलं. त्यात पुढं काम करण्याचं व्हिजन होतं. मराठा आरक्षणासाठी आम्ही अनेक महत्वाचे निर्णय घेतले.
चंद्रकांत दादांचं अनोखं व्हिजन
ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये महिलांना घर चालवताना अनेक अडचणी येतात. त्यासाठी शेतकऱ्यांकडून हंगामाच्या सुरुवातीला ५० हजार रुपये घेऊन त्याच्या पत्नीच्या खात्यात वर्षभर दरमहा पाच हजार रुपये असे बारा महिन्याचे ६० हजार रुपये देण्याची योजना व्हिजनमध्ये आहे असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
#माझामहाराष्ट्रमाझंव्हिजन | दोन भाऊ काही कारणांनी वेगळे झाले म्हणून नातं तुटत नाही, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Feb 2020 06:19 PM (IST)
एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन या कार्यक्रमात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्राबाबतचं त्यांचं व्हिजन स्पष्ट केलं. भाजप-शिवसेना पुन्हा एकत्र येण्याबाबत त्यांनी यावेळी सूचक वक्तव्य केलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -