मुंबई: मार्चमध्ये पुन्हा शिवसेनेचा महापौर मुंबई महापालिकेवर असेल, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला. तसंच मुंबई महापालिकेत भाजप खांद्याला खांदा लावून उभी राहिली नसती, तर मुंबईत एकही काम झालं नसतं, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

मुंबई महापालिकेत आज प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या तैलचित्राचं अनावरण करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते.

विशेष म्हणजे यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थिती होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रबोधनकारांच्या कार्याला उजाळा दिला.

या कार्यक्रमादरम्यान उद्धव ठाकरेंनी भाजपचे आभार मानले. उद्धव ठाकरे म्हणाले, "आम्ही मुंबईत अनेक विकासकामं केली. त्या कामाच्या उद्घाटनासाठी स्वत: मुख्यमंत्री उपस्थित होते, त्यासाठी मुख्यमंत्र्याचे आभार. त्याशिवाय भाजप मुंबई महापालिकेत खांद्याला खांदा लावून उभी राहिली नसती, तर मुंबईत विकासकामं झाली नसती. मुंबईच्या विकासकामात भाजपचाही सिंहाचा वाटा आहे"

गेल्या काही दिवसांपासून भाजपने शिवसेनेवर मुंबईच्या विकासकामावरुन हल्लाबोल केला होता. तसंच मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता.

मात्र आता उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या प्रत्येक कामात भाजपने साथ दिल्याचा दावा करत, अप्रत्यक्ष हल्ला केला.

VIDEO



मुख्यमंत्र्यांकडून प्रबोधनकार ठाकरेंच्या कार्याला उजाळा

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या कार्याला उजाळा दिला. महात्मा फुलेंना त्रास झाला, त्यावेळी सनातनी लोकांविरोधात बंड पुकारण्याचं काम प्रबोधनकारांनी केलं. जातीयता, अंधश्रद्धा दूर करण्यासाठी प्रबोधनकारांनी संघर्ष केला, असं मुख्यमंत्री म्हणाले.

VIDEO