मुंबई : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर भाजपच्या (BJP) कोअर कमिटीचा तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) देखील उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ही बैठक बोलावण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी सोमवारी रात्री आठ वाजता ही बैठक घेण्यात येणार आहे. दरम्यान या बैठकीमध्ये भाजप मराठा आरक्षणावर त्यांची भूमिका जाहीर करणार का याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. 


राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटलाय. त्यातच सोमवार (30 ऑक्टोबर) रोजी आरक्षणसाठी नेमण्यात आलेल्या उपसिमिची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये शिंदे समितीने अहवाल सरकरसमोर सादर केला. दरम्यान आता हा अहवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं. या शिंदे समितीने  1 कोटी 72 लक्ष नोंदी या समितीने तपासल्या आहेत. त्यात 11 हजार 530 नोंदी मिळाल्या आहेत. ज्यांच्या कुणबी नोंदी (Kunbi Certificate)  सापडल्या आहेत त्यांना दाखले देणार आहोत. याबाबत तहसीलदारांची बैठक घेऊन उद्यापासूनच दाखले द्यायला सुरू करणार आहोत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. 


भाजपच्या बैठकीकडे लक्ष


मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आता भाजप कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांच लक्ष लागून राहिलंय. त्यातच मराठा आरक्षणासाठी नेमण्यात आलेल्या समिचीचं अध्यक्षपद हे भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे आहे. त्यामुळे भाजपच्या या बैठकीत आरक्षणाच्या कोणत्या मुद्द्यावर चर्चा केली जाणार हे पाहणं जास्त महत्त्वाचं ठरेल. 


जरांगे उपोषणावर ठाम


दरम्यान मनोज जरांगे यांनी उपोषणावर ठाम आहेत. दिवसागणिक मनोज जरांगे यांनी पुकारलेल्या उपोषणामुळे त्यांची प्रकृति ढासळत चाललीये. त्यामुळे जरांगे यांनी प्रकृतिची काळजी घेऊन सरकारला थोडा वेळ द्यावा अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केलीये. परंतु तरीही जरांगे पाटील हे त्यांच्या उपोषणावर ठाम आहेत. त्यामुळे आता सरकार यावर कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. 


भाजपच्या या बैठकीमध्ये कोण उपस्थित राहणार यांची नावं अजूनही समोर आली नाही. पण या बैठकीला देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. त्यामुळे या बैठकीला भाजपचे कोणते नेते हजेरी लावणार याकडे सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे. 


हेही वाचा : 


Mahavikas Aghadi: मविआचे नेते तातडीने राजभवनावर, मराठा आरक्षणप्रश्नी तात्काळ अधिवेशन बोलवण्याची मागणी