मुंबई: शिवसेनेच्या सुवर्ण महोत्सवाच्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत युती तोडण्याची इच्छा नाही, असं वक्तव्य केलं असलं तरी भाजपनं सेनेला काडीमोड घेण्याचा सल्ला दिला आहे.


 

मनोगत या भाजपच्या पाक्षिकातून उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊतांवर टीकेची झोड उठवली आहे. 'राऊत साहेब तलाक केव्हा घेताय', असं शिर्षक देऊन भाजप सरकारचा निजामांचा बाप असा उल्लेख करणाऱ्या राऊतांवर भाजपचे प्रवक्ते माधव भंडारींनी टीका केली आहे.

 



 

तसंच या पाक्षिकात उद्धव ठाकरेंची तुलना 'शोले' सिनेमातल्या जेलरच्या भूमिका साकारणाऱ्या 'असरानी' यांच्याशी करून खिल्ली उडवली आहे.

 



 

एक नजर पाक्षिकातील लेखावर:

 

राऊत साहेब तलाक केव्हा घेताय?

 

महाभारतातला संजय आपल्या दिव्यदृष्टीनं कुरुक्षेत्रावरील युद्धाचे वर्णन धृतराष्ट्राला ऐकवत असे. मात्र या 'संजया'ला मराठवाड्यात निजामाच्या बापानं केलेली विकासकामं दिसू नयेत? आणि ती आपल्या कार्याध्यक्षांना (उद्धव ठाकरेंना) सांगता येऊ नयेत हा दोष कोणाच्या दृष्टीचा म्हणायचा?

 

निजामाच्या बापाच्या बिर्याणीवर ताव मारायचा, बिर्याणीचं मिशीला लागलेलं तूप पुसत हात धुवायचे आणि यजमानाच्या नावानं बोटं मोडायची. ही कुठली 'सच्चाई' हे राऊत महाशयांनी जनतेला समजावून सांगावं.

 

निजामाच्या बापाचा जाच सहन होत नसेल तर राऊत महाशयांनी बाणेदारपणे सत्तेचे ताट लाथाडायला हवे होते. तसे करण्याचे धाडस श्रीमान राऊत दाखवत नाहीत. राऊत महाशयांनी भाजपा शिवसेना युतीचा इतिहास आपल्या कार्याध्यक्षांकडून माहिती करावा. युती टिकावी म्हणून भाजपने अनेकदा दोन नव्हे तर वीस पावलेही माघार घेतली होती.

 

शोलेमध्ये जेलर झालेला असरानी आपल्या पोलीस शिपायांना, आधे इधर जाओ, आधे उधर जाओ असा हुकुम सोडतो. त्याच्या हुकूमाप्रमाणं सगळे पोलीस शिपाई डाव्या आणि उजव्या दिशेला पांगतात. असरानीच्या मागे एकही शिपाई उरत नाही. निजामाच्या बापाशी तलाक घेतला तर आपल्या मागे एकही आमदार राहणार नाही, अशी भीती कार्याध्यक्षांना वाटते की काय?