मुंबई : मुंबई महानगरपालिकेसाठी भाजप आणि मित्रपक्षांचा जागा वाटपाचा तिढा सुटला आहे. भाजप, रिपब्लिकन पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसंग्राम यांच्यातील जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला.

या फॉर्म्युल्यानुसार भाजप 192 जागा, आरपीआय 25, रासप 6 आणि शिवसंग्रामच्या 4 जागा लढवणार आहे.

मुंबई महापालिकेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर

भाजपने कालच आपल्या 192 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यामुळे अवघ्या 35 जागांवर तीन मित्रपक्षांना समाधानी करण्याचं आव्हान भाजप नेत्यांसमोर होतं. पण, भाजपने हे आव्हान लिलया पेललं आहे.

...तर रिपाइंला मुंबईचं उपमहापौरपद : दानवे



मुंबईचा महापौर भाजप आणि मित्र पक्षाचा बनवण्यासाठी आम्ही पाऊल टाकलं आहे. मुंबई महापालिकेत सत्ता आल्यास उपमहापौरपद रिपाइंला देणार असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितलं.

एकदा महायुतीचा महापौर करुन तर बघा! : आठवले



मुंबई महापालिकेसाठी 40-45 जागा मिळतील अशी आमची अपेक्षा होती. पण त्यांनी 25 जागा दिल्या. त्या आम्ही मान्य केल्या. मुंबईतील ट्रॅफिक, पर्यावरणाच्या काळजीसाठी एकदा महायुतीचा महापौर करुन तर बघा, असं आवाहन रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनी केलं आहे.

समाधानी पण संतुष्ट नाही : मेटे


दरम्यान मुंबई महापालिकेसाठी शिवसंग्रामच्या खात्यात 35 पैकी चार जागा आल्या आहेत. यावर प्रतिक्रिया देताना शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे म्हणाले की, समाधानी आहोत, पण संतुष्ट नाही. दरम्यान शिवसंग्रामकडे निवडणूक चिन्ह नसल्यामुळे त्यांचे चारही उमेदवार भाजपच्या कमळावर निवडणूक लढवणार आहेत.

त्यामुळे 35 जागांवर लढणारे मित्रपक्ष इतर जागांसाठी भाजपच्या किती कामी येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.