मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला अजून दोन वर्ष शिल्लक आहेत, परंतु सर्वच पक्षांनी त्यासाठी आतापासूनच कंबर कसली आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसने स्वबळाचा सूर आळवला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करुनच निवडणूक लढवावी असा विचार मांडला आहे. विशेष म्हणजे मुंबईत संघटना मजबूत करण्यासाठी आता खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार हे लक्ष घालणार आहेत, अशी माहिती पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.


मुंबई महापालिका निवडणुकीचे पडघम दोन वर्ष आधीच वाजायला सुरुवात झाली आहे. भाजपने मिशन मुंबई अंतर्गत रणनीती आखली आहे. तर शिवसेनेही मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. बीएमसीमधील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढावी असं म्हटलं आहे. मात्र राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे त्याप्रमाणे मुंबई महापालिकेची निवडणूक आघाडीतच लढवावी अशी भूमिका नवाब मलिक यांनी मांडली आहे.


खरंतर शिवसेनेच्या साथीने लढल्यास राष्ट्रवादीचा फायदा होणार असल्याचं म्हटलं जात आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत राष्ट्रावादीचं कायमच मुंबईकडे दुर्लक्ष झालेलं आहे, असं नवाब मलिक यांनीही मान्य केलं आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीला कसर भरुन काढायची आहे. राष्ट्रवादीकडून मुंबईत पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी वॉर्डमध्ये तयारी सुरु आहे. कार्यकर्त्यांना तयार केलं जात आहे, नवीन चेहऱ्यांना संधी दिली मिळण्याची शक्यता आहे. मुंबईतील राष्ट्रवादीचे चेहरे म्हणून ओळख असलेल्या सचिन अहिर, प्रकाश सुर्वे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. आता नवाब मलिक हे मुंबईतील राष्ट्रवादीचा चेहरा आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त इतर मोठ्या नेत्यांना पक्षाची जबाबदारी घ्यावी लागणार आहे. त्यानुसार सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हे देखील मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत लक्ष घालतील, या सगळ्या प्रक्रियेत सहभागी होतील, असं म्हटलं जात आहे. जबाबदारीचं अधिकृत वाटप झालेलं नसलं तरी कोविड काळाच्या आधी जसे मेळावे भरत होते तसेच मेळावे कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्यानंतर पुन्हा एकदा भरवले जातील. त्यावेळी सुप्रिया सुळे आणि रोहित पवार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील, असं सांगितलं जात आहे.


BMC Elections | मुंबई महापालिकेवर कुणाचा भगवा फडकणार? दीड वर्ष अगोदरच ताकद आजमावणं सुरु