मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेलं लॉकडाऊन हळूहळू उठवण्यात येत आहे. राज्यात मिशन बिगेन अगेन अंतर्गत मुंबईकरांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई मेट्रो सेवा टप्प्याटप्प्याने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.येत्या १९ तारखेपासून मुंबईची लोकलनंतरची रुळावरची लाईफलाईन मेट्रो पुन्हा एकदा धावायला सुरुवात होणार आहे. आजपासून घाटकोपर-वर्सोवा मुंबई मेट्रोच्या सुरक्षा चाचण्या आणि प्रयोगिक फे-या घेतल्या जात आहे.


लॉकडाऊन नंतर ब-याच काळानं सुरु होणा-या मेट्रो प्ररवासादरम्यान प्रवाशांना मेट्रोच्या विशेष नियमावलीचं पालन करावं लागणार आहे. नियम पाळून सुरु होणाऱ्या मेट्रोच्या प्रवासामुळे बेस्ट आणि रस्ते वाहतूकीचा बराचसा ताण हलका होणार आहे. त्यामुळे आता मेट्रेा पाठोपाठ लोकलही लवकर सुरु करावी ही मागणी पुढे येत आहे. मात्र, 19 ऑक्टोबरपासून सुरु होणारा मेट्रो प्रवास ही लोकल सुरु करण्यासाठीची लिटमस टेस्ट देखील ठरु शकते. त्यामुळे मेट्रो सुरु झाली तरी नियमावलीची कठोर अंमलबजावणीही तितकीच गरजेची ठरणार आहे.


लॉकडाऊननंतर सुरु होणा-या मेट्रो प्रवासात काय काय बदलणार?




  • मुंबई मेट्रो सकाळी 8.30 ते रात्री 8.30 या वेळेतचं धावणार

  • प्रवास करताना प्लॅस्टिक टोकनवर बंदी

  • प्लॅस्टिक टोकनऐवजी क्युआर पेपर तिकीट, स्मार्ट कार्ड, डिजीटल तिकीट यांचा वापर होणार

  • प्रवाशांना एकाआड एक सीटवर बसण्याची परवानगी

  • उभ्यानं प्रवास करणा-या प्रवाशांनाही विशीष्ट खुणा केलेल्या जागेतच उभे राहावे लागणार

  • प्रवाशांनी मास्क घालणे आणि सोशल डिस्टन्स पाळणे बंधनकारक

  • गर्दी होऊ नये यासाठी प्रवेशद्वारावरुन मर्यादित प्रवासी संख्येलाच प्रवेश देण्यात येईल

  • प्रवेश द्वारांवरच प्रवाशांकरता सूचना आणि प्रोटोकॉलची माहिती देण्यात येणार

  • गर्दी लक्षात घेऊन मर्यादित प्रवासी संख्येलाच आत सोडले जाणार

  • कॉमन टचिंग पॉईंटस् : स्टेशन, तिकीट खिडकी, सीट, खांब यांचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण केले जाणार

  • ट्रेनच्या आत तापमान नियंत्रण आणि मोकळ्या हवेसाठी व्यवस्था : ट्रेनच्या आतील तापमान हे 25 ते 27 डिग्री इतके ठेवले जाणार आहे. मोकळ्या हवेसाठी मेट्रोचे डंपर वेळोवेळी उघडे ठेवले जाणार आहे. मेट्रोचे दार प्रत्येक स्टेशनवर 30 सेकंद खुले राहणार असून टर्मिनस स्टेशनवर 180 सेकंद खुले राहिल जेणेकरुन मोकळी हवा आत प्रवेश करु शकेल.

  • प्रत्येकाचे थर्मल स्कॅनिंग : मेट्रो स्थानकात प्रवेश करणा-या प्रत्येकाचे थर्मल स्कॅनिंग होणार आहे.

  • ठिकठीकाणी प्रवाशांना सॅनिटायझरची सोय उपलब्ध असेल

  • मेट्रोच्या नव्या प्रोटोकॉलनुसार मेट्रो स्थानके आणि ट्रेन्सची वेळोवेळी स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण होणार

  • मेट्रो स्थानकांची सुरक्षा अधिक कडक केली जाईल