मुंबई :   शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज होणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, समितीचे अध्यक्ष सुभाष देसाई, आदित्य ठाकरे उपस्थित रहाणार आहेत. मात्र कार्यक्रमाला भाजपच्या नेत्यांना निमंत्रण न दिल्याने मानापमान नाट्य रंगलं आहे. 


यावरुन भाजप नेत्यांनी सरकारवर टीका केली आहे. भाजप आमदार नितेश राणेंनी म्हटलं आहे की, आज बाळासाहेब असते तर असे होऊ दिले नसतं.  एक सच्चा, मूळ शिवसैनिक एकनाथ शिंदे ज्यांच्या खात्याचा हा कार्यक्रम आहे. त्यांनाच बोलवण्यात नाही आलं. याने शिवसेनेत सुरु असेलेली गटबाजी सिद्ध होते. आज शिवसेनेमध्ये कडवट शिवसैनिकांची किंमत नाही, असं नितेश राणेंनी म्हटलं आहे. 


नितेश राणे म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांनी या स्मारकासाठी केंद्रापासून ते राज्यामध्ये सर्व परवानग्या मिळवून दिल्या. त्यांनी या कार्यक्रमाला येण्याचा मान कमवलाय तर राज ठाकरे परिवाराचे आहेत म्हणून त्यांना तिथे येण्याचा अधिकार आहे, पण त्यांनाही नाही बोलवलं गेलं. हा त्यांचाही अपमान आहे, असं नितेश राणेंनी म्हटलं आहे.